‘विरोधी पक्षात बसून बोलणे सोपे असते,’ असा टोला आमदार अजित पवार यांनी एलबीटीच्या प्रश्नावर भाजप सरकारला लगावला. ‘एलबीटीच्या प्रश्नावर आता व्यापाऱ्यांनीच काय ते ठरवावे,’ असेही पवार या वेळी म्हणाले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुरुवारी झाली. या बैठकीला क्रीडामंत्री या नात्याने तावडे आणि असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने पवार उपस्थित होते. या बैठकीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे दोन्ही नेत्यांचे म्हणणे आहे. क्रीडा धोरण ठरवण्यासाठी ही बैठक झाली असल्याचे पवार यांनी सांगितले.
या बैठकीनंतर माध्यमांनी एलबीटीच्या प्रश्नाबाबत शासनाने घेतलेल्या भूमिकेबाबत पवार यांना विचारले असता, त्यांनीही सरकारला टोला हाणायची संधी सोडली नाही. ते म्हणाले ‘एलबीटीच्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसची भूमिका कायमच सकारात्मक राहिली आहे. विरोधी पक्षात असताना सत्तेत आल्यानंतर एलबीटी बंद करू, टोल बंद करू अशा घोषणा भाजपने केल्या होत्या. मात्र, विरोधी पक्षात असताना बोलणे सोपे असते. सत्तेत आल्यानंतर काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. वस्तू व सेवा कर (जीएसटी) सुरू केल्याशिवाय एलबीटी बंद करणे शक्य नसल्याची भूमिका सरकारने घेतली असल्याचे वृत्तपत्रांत वाचले. याबाबत आता व्यापाऱ्यांनीच निर्णय घ्यावा.’
या तावडे आणि पवार यांच्या बैठकीत बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन बांधणे, खेळाडूंना ५ टक्के आरक्षण देणे यांबाबत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. याबाबत नागपूर येथील अधिवेशनानंतर पुन्हा एकदा बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले. भाजपला पाठिंबा दिल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता पवार म्हणाले, ‘भाजप पाठिंबा मागण्यासाठी आला नव्हता. राज्यात स्थिर सरकार असणे आवश्यक आहे म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपणहून पािठबा दिला आहे. याबाबत पक्षात नाराजी नाही.’

Story img Loader