पिंपरी- चिंचवड शहरामध्ये काका आणि पुतणे म्हणजेच अजित पवार आणि रोहित पवार यांची चर्चा सुरू आहे. पिंपरी- चिंचवड शहराची ओळख अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून आहे, आणि हाच बालेकिल्ला काबीज करण्यासाठी शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार हे वारंवार पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. असं असताना आता अजित पवार यांनीच थेट रोहित पवार यांना लक्ष करत त्यांचं नाव न घेता टीका केली आहे. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या गणपती देखावा आणि गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कविता आल्हाट, संजोग वाघेरे, विलास लांडे, नाना काटे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.
हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमाला नाट्यगृह निम्मे रिकामे?
यावेळी अजित पवार म्हणाले, पिंपरी- चिंचवड शहरात काहीजण येऊन वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांना पदाधिकाऱ्यांना माहित आहे, की स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्यानंतर मीच पिंपरी- चिंचवड शहरात लक्ष घातलं. वेळप्रसंगी कठोर निर्णय घेतले. शहरातील विकासासाठी मी कटिबद्ध राहिलो. शेवटच्या घटकाचा विचार करून मी निर्णय घेतले. पिंपरी- चिंचवड शहराचा विकास हा १९९२ पासून आजतागायत करत आलो आहे. महानगर पालिकेच्या माध्यमातून अनेकांना महत्त्वाची पदे दिली. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
मीरा बोरवणकर यांच्या आरोपावर म्हणाले…
अलीकडे बातम्या काहीही दिल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून माझ्या बद्दल बातमी सुरु आहे. तुम्हाला ही याची कल्पना असेल. पण यात माझा दुरान्वये काही ही संबंध नाही. काही कार्यकर्ते येतात अन मी पालकमंत्री असल्यानं मला कामं सांगतात. आता कार्यकर्ता म्हणाला म्हणून मी एकदा त्यांना विचारलं ते काम काय आहे. ३ कोटींची जागा देऊन १५ कोटी मिळणार होते. आता फायदा होणार असेल तर करा म्हटलं, त्या म्हणाल्या नाही होणार. मी म्हटलं सोडून द्या. पण उगाच नको त्या बातम्या सुरू झाल्या.