आज किल्ले शिवनेरीवर शिवजयंती साजरी केली जात आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अजित पवार बोलायला उभे राहिले. यावेळी एक तरुण उभा राहिला आणि त्याने मराठा आरक्षणाची मागणी केली. तो म्हणाला, “ओबीसी आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या वतीने एक विनंती आहे, २३ मार्च १९९४ चा GR काढला होता. ओबीसी आरक्षण वाढवण्याबद्दल राज्यात श्वेतपत्रिका निघायला पाहिजे. १४ टक्के आरक्षण ३० टक्के केले ते मराठांच्या हक्काचं होतं. परत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे,” अशी मागणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “काही तरुणांनी मराठा आरक्षणाची मागणी केली. त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही विधीमंडळात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र काही कारणाने न्यायालयाकडून ते आरक्षण फेटाळण्यात आलं. नंतर आयोग स्थापन करून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं. ५० टक्क्यांवर आरक्षण जाऊ शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच यासंदर्भात कायदा करून आरक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवा. आम्ही आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे,” असं ते म्हणाले.

Shiv Jayanti 2022: किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह; अजित पवारांसह अनेक नेत्यांकडून मानवंदना

दरम्यान, अजित पवार हे बोलत असताना तो व्यक्ती पुन्हा उभा राहिला. तेव्हा अजित पवार वैतागून म्हणाले, “तू कोणाची सुपारी घेऊन आला आहेस का?, मी एकदा तुमचं ऐकून घेतलं. आता तुम्ही माझं ऐका. आज शिवजयंती आहे, ही पद्धत नाही बोलायची. आम्हाला कळत नाही का, आम्ही पण मराठा समाजाचे आहोत, पण राज्याचे नेतृत्व करत असतांना सगळा विचार करावा लागतो. असं असतांना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं, विधिमंडळ एकमताने ते मंजूर केलं. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, कारण सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, असं त्यांनी म्हटलं. छत्रपतींनी अठरापगड जातींना सोबत घेऊन पुढे जायचं, हे शिकवलं,” असंही अजित पवार म्हणाले.

तरुण मुलांचं रक्त सळसळत असतं, हे आम्हाला मान्य आहे, परंतु आरक्षणात येणाऱ्या कायदेशीर अडचणी समजून घेतल्या पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना आजच्या दिवसाच्या निमित्ताने विनंती करतो की त्यांनी आंदोलन करू नये, अशी विनंती त्यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar speech at shivneri fort over maratha reservation hrc