पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दिल्ली दौरा झाला की दोन ते तीन दिवसांत महायुतीचे उमेदवार ठरतील. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबाबतचा निर्णयही दोन ते दिवसांत जाहीर होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीर केले. आढळराव यांच्या उमेदवारीचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र त्यांच्या नावाला खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी विरोध दर्शविला होता. मात्र, अजित पवार यांचा आग्रह असल्याने मोहिते पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी बुधवारी मोहिते पाटील यांची भेट घेतली तसेच काही विधानसभा मतदारसंघात मेळावेही घेतले. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, सुरेखा मोहिते पाटील, सुरेश घुले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, अरूण चांभारे, अनिल राक्षे, मंगल चांभारे, अरूण चौधरी, आनंदा काळे या वेळी उपस्थित होते. या मेळाव्यात दिलीप माेहिते पाटील यांनी आढळराव यांच्या विरोधातील आक्रमक भूमिका मवाळ करत पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करण्याचे जाहीर केले.

हेही वाचा >>>पुण्यातील ‘मोदीबागे’त भेटीगाठी, बैठकांचा धडाका; राज्यातील विविध नेत्यांची शरद पवार यांच्याबरोबर चर्चा

दरम्यान, मेळाव्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दिल्ली दौरा झाला की दोन ते तीन दिवसांत महायुतीचे उमेदवार ठरतील. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबाबतचा निर्णयही दोन ते दिवसांत जाहीर होईल. महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मी असे आम्ही दिल्ली दौऱ्यानंतर बैठक घेणार आहोत. जागावाटप झाले की तिकीट जाहीर होईल,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>गुप्त पद्धतीने आणि गनिमी काव्याने पार्थ पवारांचा प्रचार चालू : अजित पवार

‘मनसेला मित्र पक्ष म्हणून घेण्यास आमचा विरोध नाही. डॉ. अमोल कोल्हे यांना मी पक्षात घेतले. लोकसभेचे तिकीट दिले. त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. चित्रपट, मालिका, नाटक यामुळे वेळ मिळत नाही, असे सांगून ते काही महिन्यात राजीनामा देण्यासाठी निघाले होते. हा जनतेचा अपमान नाही का, अशी विचारणाही पवार यांनी केली.

बराक ओबामा आले तरी फरक पडत नाही. अजित पवार यांनी समोर उभे राहावे, असे आव्हान देणारे शिवाजीराव आढळराव त्याच अजित पवारांच्या पक्षात जात आहेत. माजी खासदारांना चौथ्या पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा.- डॉ. अमोल कोल्हे, खासदार