राष्ट्रवादीशी सलग्न आमदार विलास लांडे यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेल्या नगरसेवक महेश लांडगे यांच्या भोसरीतील कार्यक्रमाला हजेरी लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांडगे यांना ‘बळ’ दिले. त्याच वेळी, आमदार-महापौरांची नावे पत्रिकेत टाकून मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता, अशा कानपिचक्या देत लांडे यांच्याविषयी ‘कळकळ’ही व्यक्त केली. नात्यागोत्याचे विषय घरातच ठेवा, भोसरीत फूट पडू देऊ नका, असा वडीलकीचा त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या हिताचा सल्लाही दिला.
भोसरी विधानसभेच्या संभाव्य ‘पाटिलकी’ वरून विलास लांडे विरुध्द महेश लांडगे यांच्यात ‘गृहकलह’ सुरू आहे. आमदार व्हायचे ध्येय ठेवून लांडगेंनी भोसरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केल्या. पेपरच्या जाहिराती, गावोगावी लागलेल्या फ्लेक्समुळे जोरदार वातावरण निर्मिती झाली. लांडगेंनी स्पर्धेच्या निमित्ताने सर्वपक्षीय एकत्र आणले, वरवर का होईना, गावची एकी दाखवली. हजारो क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत रविवारी उद्घाटन सोहळा झाला. अजितदादा येतील की विलास लांडे यांच्या सांगण्यावरून ऐनवेळी दांडी मारतील, अशी धास्ती सर्वानाच होती. तशी शक्यता लांडगे यांनी आपल्या भाषणातही केली होती. आम्ही खेळात राजकारण आणत नाही व राजकारणाचा खेळ करत नाही, असे चिखलीच्या अनुभवावर आधारित विधान लांडेंना उद्देशून केले. दादा, तुमच्या शब्दापुढे कालही नव्हतो व उद्याही नसेन, या शब्दांत निष्ठा व्यक्त केली. लांडे-लांडगे यांच्यात भांडणास कारणीभूत ठरलेल्या मात्र सद्य:स्थितीत समतोल राखण्याचा प्रयत्नात असलेल्या अजितदादांनी स्पर्धेचे महत्त्व, पैलवानांची महती विशद करताना उत्कृष्ट संयोजनाचे विशेषत: महेश लांडगेंचे कौतुक केले. मात्र, महापौर व आमदारांचे कुठेच नाव नाही, याचा आवर्जून उल्लेख केला. जनतेला जो योग्य वाटेल, त्याला ते पाठिंबा देतील. मात्र, आपण मनाचा मोठेपणा दाखवून त्यांचे फोटो टाकले असते तर बरे झाले असते. नात्यागोत्यात काय आहे, ते घरातच राहू द्या, भोसरीत अंतर पडू देऊ नका, असा सल्लाही दिला. अजितदादांनी एकाच वेळी बंडाच्या पवित्र्यात असलेल्या लांडगे यांना बळ दिले. तर, सातत्याने फटकून वागवलेल्या व नंतर अडीच वर्षांचे महापौरपद देऊन गोंजारलेल्या लांडे यांच्याविषयी कळकळही व्यक्त केली.

Story img Loader