उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संपर्कात आहेत. थोरात यांचा पुढील आठवड्यात पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याने दौंड विधानसभा मतदार संघात महायुतीला धक्का बसणार आहे. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर दौंडचे माजी आमदार थोरात हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संपर्कात असल्याने महायुतीपुढे या दोन्ही मतदार संघांमध्ये आव्हान उभे राहणार आहे.

हेही वाचा >>> शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ९० लाखांची फसवणूक

दौंड मतदारसंघ महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास थोरातही इच्छुक होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर थोरात यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. मात्र दौंड मतदारसंघ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून थोरात हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला येत्या काही दिवसात पूर्णविराम मिळणार असून थोरात यांचा पुढील आठवड्यात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> डॉक्टरांमुळे पुणे पालिकेला डोकेदुखी! अखेर उचलावे लागले कारवाईचे पाऊल; जाणून घ्या नेमका प्रकार…

थोरात हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे दौंडमध्ये सक्षम उमेदवार नसल्याने थोरात यांची उमेदवारी ही निश्चित मानली जात आहे. त्यामुळे दौंडमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि थोरात यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीमध्ये इंदापूरची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) मिळणार असल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. आता जिल्ह्यात आठवडाभरात महायुतीला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.