लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे / बारामती : मोठा गाजावाजा करून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार करणारे अजित पवार यांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबरचे रक्षाबंधन पूर्वनियोजित दौऱ्यामुळे झाले नाही. अजित पवार मुंबईत तर, खासदार सुप्रिया सुळे सोमवारी नाशिक दौऱ्यावर असल्याने ‘लाडक्या बहिणी’ पासून ‘दादा’ दूरच राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबातही दुफळी निर्माण झाली आहे. कुटुंबात मला एकाकी पाडले जात आहे, अशी जाहीर खंत लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी सातत्याने व्यक्त केली होती. मात्र राजकारण वेगळे आणि कौटुंबिक नाते वेगळे, असे सांगत राजकीय भूमिकांचा परिणाम पवार कुटुंबावर होणार नाही, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सुप्रिया सुळे-अजित पवार यांचे रक्षाबंधन साजरे होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यातच अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेचा मोठा गाजावाजा अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांकडून सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज निकाल

या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना रकमेचे वितरणही थाटात करण्यात आले होते. या योजनेवरून मात्र विरोधकांनी महायुतीवर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला लाडकी बहीण आठवत आहे. या योजनेमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर, त्यांच्याकडून राखी बांधून घेईन, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुळे-पवार एकत्र येणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र दोघेही पूर्वनियोजित दौऱ्यावर असल्याने गतवर्षीप्रमाणे रक्षाबंधन साजरे होऊ शकले नाही. मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पार्श्वभूमीवर सुळे-पवार यांचे ‘दूर’ राहिलेल्या रक्षाबंधनाची चर्चा मात्र सुरू झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar supriya sule do not have rakshabandhan due to pre planned tour pune print news apk 13 amy