पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमधील महत्त्वाचे नेते, अर्थात खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी या दोघांनी एकमेकांशी थेट बोलणं जरी टाळलं असलं तरी भाषणातून त्यांच्यात सवाल-जवाब रंगल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आधी सुप्रिया सुळेंनी भाषणातून केलेल्या प्रश्नावर लागलीच अजित पवारांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया सुळेंचा प्रश्न, अजित पवारांचं उत्तर!

पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंना आधी भाषणासाठी पाचारण करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळेंनी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार असतानाच रखडलेल्या पालिका निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. “माझी राज्य सरकारकडे मागणी आहे. इथे अनेक दिवस नगरसेवक नाहीयेत. गेल्या दोन-अडीच वर्षांत इथे निवडणूक न झाल्यामुळे या भागातल्या जनतेनं कुणाकडे प्रश्न मांडावेत? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी नगरसेवकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळे नगरसेवकांची निवडणूक आपण लवकरात लवकर घेतली, तर या भागातल्या लोकांना मोठा आधार मिळेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“आमचं घर फुटलं तेव्हा मी दिवसभर रडत होते, शरदचा मला फोन आला…”, सरोज पाटील यांनी सांगितला प्रसंग!

सुप्रिया सुळेंच्या या मुद्द्यामुळे दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून राजकीय कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर भाषणासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीला मान्यवरांचे आभार मानल्यानंतर लागलीच सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर प्रत्युत्तर दिलं.

“सर्वोच्च न्यायालयामुळे निवडणुका रखडल्या आहेत”

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारमुळे नसून सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या असल्याचं अजित पवार म्हणाले. “दोन वर्षांपेक्षा जास्त काळ महानगर पालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. पण त्या सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या आहेत. आम्हीही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी असं आम्हालाही वाटतं. पण सर्वोच्च न्यायालयात ओबीसी यासंदर्भातला एक मुद्दा गेला आहे. त्याचा निकाल लवकर लागत नाहीये. राज्य सरकार सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात याच मताचं महायुतीचं सरकार आहे याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी”, असा सूचक उल्लेख अजित पवारांनी भाषणात केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar supriya sule in pune multispecialty healing hospital program pmw