पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील पराभव जिव्हारी लागलेल्या अजित पवार यांनी बारामतीची कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यमान पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात झाली आहे. पवार यांना नवे शिलेदार १५ ऑगस्ट रोजी मिळणार आहेत. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभूत व्हावे लागले होते. हा पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला होता. बारामतीमधील दौऱ्यावेळी रविवारी त्यांनी ही खंत जाहीरपणे बोलून दाखविली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी माझी आहे, असे सांगतानाच पवार यांनी अनेक मतदान केंद्रांवर मते कमी पडल्याचे स्पष्ट केले. पक्षातील कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपेक्षित काम केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट झाले होते. संघटनेत नवे बदल करायचे आहेत. त्यामुळे बारामतीमधील कार्यकारिणीने राजीनामा द्यावा, असा आदेशही त्यांनी दिला.
हेही वाचा >>>कर्करोगावर उपचारासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर! ‘रेडीझॅक्ट एक्स ९ टोमोथेरपी’ ठरतेय रूग्णांसाठी वरदान
पवार यांच्या आदेशानंतर पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्यास सुरुवात झाली आहे. पवार येत्या शुक्रवारपासून राज्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची बारामतीची कार्यकारिणी अस्तित्वात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जुन्या चेहऱ्यांनाही संधी?
पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्यानंतर काम न केलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नव्याने पक्षसंघटना बांधणी करताना नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, काही जुन्या पदाधिकाऱ्यांनाही वेगळी जबाबदारी दिली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार यांची बारामतीमधील नवी कार्यकारिणी कशी असेल, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
© The Indian Express (P) Ltd