उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळजाई टेकडीवरील घाणीवरून पुणेकरांना टोला लगावला आहे. तळजाई टेकडीवर येताना कुत्रे घेऊन येऊ नका, त्यांचे घरीच लाड करा, असं अजित पवार म्हणाले. तळजाई टेकडीवरील वन उद्यानातील विकासकामांचं आज सकाळी अजित पवारांनी उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी टेकडीवर असलेल्या घाणीवरून पुणेकरांना टोला लगावला.
“टेकडीवर तुम्ही फिरायला या, पण तुमच्यासोबत तुमचे कुत्रे लाडाने घेऊन येऊ नका. त्याचे घरी काय लाड करायचे ते करा, घरी गादीवर झोपवा आम्हाला काही घेणं-देणं नाही. तुमच्या मुलांपेक्षा कुत्र्याला जास्त सांभाळा, आमचं काहीही म्हणणं नाही. पण त्या कुत्र्याला टेकडीवर घेऊन येऊ नका,” असं अजित पवार म्हणाले. कुत्र्यांमुळे टेकडीवर घाण होते, त्यामुळे फिरायला येताना फक्त तुम्ही या, तुमचे कुत्रे आणू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपाकडून सरकार पाडण्याच्या दाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. सरकारला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. “गेल्या सव्वा दोन वर्षापासून भाजपाकडून ही वक्तव्ये केली जात आहे. जोपर्यंत १४५ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तीन पक्ष एकत्र आहे, तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,” असं अजित पवार म्हणाले.