पुणे मेट्रोसंबंधीच्या अनेक आक्षेपांची पूर्तता राज्य शासनाकडून न झाल्यामुळे केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारनेच मेट्रो प्रकल्पाला निधी देण्याबाबत स्पष्टपणे असमर्थता दर्शवली होती ही वस्तुस्थिती असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र केंद्राच्या अंदाजपत्रकात मेट्रोला निधी न दिल्याबद्दल शनिवारी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. मेट्रोसंबंधीची आवश्यक कार्यवाही राज्य शासनाने आणि पुणे महापालिकेने न केल्यामुळेच हा प्रकल्प अडल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
भामा आसखेड धरणातून पुणे शहराला पाणी आणण्याच्या योजनेचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. तसेच विमाननगर येथे बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग ट्रॅकचेही उद्घाटन पवार यांनी केले. यावेळी अजित दादांनी लखनौ आणि अहमदाबादच्या मेट्रोला केंद्राच्या अंदाजपत्रकात निधी मंजूर झाला आहे; पण पुण्याच्या मेट्रोसाठी मात्र तरतूदच नाही, तर तिथे कारभारी काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला. मेट्रोच्या निधीसाठी पुण्याच्या खासदारांनी पाठपुरावा करावा, अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.
प्रत्यक्षात पुणे मेट्रोसंबंधी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यापासून ते प्रकल्प अहवालात दुरुस्त्या करण्याबाबत आणि अनेक गोष्टींची पूर्तता करण्याच्या स्पष्ट सूचना केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यातच राज्य शासनाला केल्या होत्या. त्या पत्राची प्रत महापालिका आयुक्तांनाही मिळाली होती. केंद्राने पुणे मेट्रोला तत्त्वत: मान्यता दिली असली, तरी जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत केंद्राकडून पुणे मेट्रोला निधी मिळणार नसल्याचेही त्या पत्रात स्पष्ट करण्यात आले होते. ही वस्तुस्थिती असली, तरी दादांनी मात्र मेट्रोला निधी न मिळाल्याबद्दल सध्याच्या सरकारला जबाबदार धरले.
नेहरू योजनेतील अपूर्ण प्रकल्पांना यापुढे निधी मिळणार का नाही हे अंदाजपत्रकातून स्पष्ट होत नाही. पुणे, नगर आणि नाशिकमध्ये भाजपचे खासदार आहेत. तरीही पुणे-नाशिक रेल्वेसाठी तरतूद का होत नाही, असाही प्रश्न यावेळी पवार यांनी उपस्थित केला. शहरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याच्या योजनेत जी दिरंगाई झाली आहे, त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ज्यांच्यामुळे हा विलंब झाला त्यांच्यावर कारवाईच झाली पाहिजे, असेही सांगितले. राज्याच्या बहुतांश भागात पावसाअभावी पाणीपुरवठय़ाची स्थिती बिकट झाली असून नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. महापौर चंचला कोद्रे, आयुक्त विकास देशमुख, उपमहापौर बंडू गायकवाड, आमदार बापू पठारे, शरद रणपिसे, तसेच बापूराव कर्णे गुरुजी, सुभाष जगताप, नीलेश निकम, महादेव पठारे, उषा कळमकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

Story img Loader