पुणे : ‘जिल्ह्यातील पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा. तसेच, तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे,’ अशी सूचना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी येथे केली. जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांसाठी संबंधित यंत्रणांनी ३१ मे पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन डिसेंबरअखेर कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विधानभवन येथे झाली. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्यासह सर्व आमदार आणि खासदार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसारखा निधी दिला जाईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णालयात उपचारांसाठी लागणारी पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, असे पवार यांनी स्पष्ट केले.यावेळी मंत्री श्री. पाटील, मंत्री श्री. भरणे, राज्यमंत्री श्रीमती मिसाळ, श्रीमती गोऱ्हे यांच्यासह आमदार यांनी विविध सूचना केल्या.

१,५८९ कोटींच्या जिल्हा वार्षिक आराखड्याला मंजुरी

जिल्ह्यासाठी सन २०२५- २६ च्या सर्वसाधारण योजनेसाठी १ हजार ३७९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १४५ कोटी रुपये आणि आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ६५ कोटी ४६ लाख रुपये या प्रमाणे एकूण १ हजार ५८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.