लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वाघोली अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला जाईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. अपघातातातील जखमींवरील उपचारांचा खर्च शासनाकडून केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

नगर रस्त्यावरील वाघोली भागात मद्यधुंद डंपरचालकाने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना सोमवारी रात्री चिरडले. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तसेच सहा जण गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना घडल्यानंतर अजित पवार यांनी वाघोली पोलीस ठाण्यासमोर असलेल्या घटनास्थळाला सोमवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आणखी वाचा-वाघोलीतील घटनेची पुनरावृत्ती टळली; मावळमध्ये भरधाव टेम्पो पलटी, मद्यधुंद चालकाला बेड्या

पवार म्हणाले, ‘अपघाताची घटना दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल. अपघातात जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू’.

अमरावतीत उद्योगधंदे नाहीत. बेरोजगारीमुळे पुण्यात यावे लागते. डंपर अपघातात ‘होत्याचे नव्हते’ झाले. शासनाने आम्हाला नोकऱ्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशी विनंती अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांनी केली.

डंपरचालकाला पोलीस कोठडी

वाघोली अपघात प्रकरणात डंपरचालक गजानन तोटरे याला अटक करण्यात आल्यानंतर सोमवारी त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. आरोपीने मद्यप्राशन कोठे केले, तसेच त्याच्याबरोबर कोण होते, त्याच्याकडे वाहन परवाना आहे का ? यादृष्टीने तपास करायचा आहे. तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. विजयसिंह जाधव यांनी युक्तिवादात केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी डंपरचालक तोटरेला २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा-वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !

डंपरचालकाची उडवाउडवीची उत्तरे

अपघातानंतर डंपरचालक तोटरेला ताब्यात घेण्यात आले. त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. डंपर कोणाचा आहे, तसेच तो किती वर्षांपासून त्याच्याकडे काम करत आहे. याबाबत सखोल तपास करायचा असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी केली.

Story img Loader