लोकसत्ता वार्ताहर

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शिवतीर्थ मंगल कार्यालयाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे नूतनीकरण अनावरण समारंभ आणि शेतकरी मेळाव्याच्या आयोजन कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता. २८ मार्च ) रोजी सकाळी दहा वाजता बारामती दौऱ्यावर येत आहेत. अशी माहिती माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप यांनी दिली.

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालय मध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मेळावा मध्ये काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, नजीकच्या काळात माळेगाव सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखाना सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार हे माळेगाव कारखानाची निवडणुकीमध्ये लक्ष घालणार असल्याचे यापूर्वी युवा नेते युगेन्द्र पवार यांनी जाहीर केले असल्याने माळेगाव कारखान्याचे निवडणुकीच्या हालचालींना कमालीचा वेग आल्याचा दिसून येत आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणारा उसाचा दर, नीरा नदीत झालेले पाण्याचे प्रदूषण, सभासदांची झालेली नोंदणी, आणि कामगार आणि अधिकाऱ्यांच्या पगार वाढ यासारखे अनेक प्रश्न सध्या चर्चे मध्ये असून याबाबत अजित पवार आपल्या भाषणातून खुलासा करणार का ? याकडे तालुक्यातील राजकीय नेते आणि कारखान्याचे सभासदांचे लक्ष लागून आहे.