बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघातील लक्षवेधी लढतीचा निकाल काय लागणार, यापेक्षाही सोमवारी (१८ नोव्हेंबर) होणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘सांगता’ सभेची बारामतीमध्ये चर्चा अधिक आहे. या सभेत ते जाहीरपणे कोणती निर्णायक भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता आहे. बारामतीत सर्वत्र भावनिक लाट दिसत असून, विकासाच्या मुद्द्यावरून मतदारांच्या ओठांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव असले, तरी पोटी मात्र शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यातील लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युगेंद्र पवार यांच्यात सरळ लढत होणार आहे. अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या विकासकामांबाबत मतदारांमध्ये चर्चा होते. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीड वर्षांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने त्याबाबत बारामतीत भावनिक वातावरण असून, त्यांच्या ‘सांगता’ प्रचारसभेची बारामतीत मोठी चर्चा आहे. बारामतीकर आजवर शरद पवार सांगतील त्या उमेदवाराला पाठिंबा देत आले आहेत. त्यांचा ‘शब्द’ महत्त्वाचा असल्याने प्रचाराच्या सांगता सभेमध्ये त्यांच्याकडून कोणता ‘शब्द’ दिला जाणार, यावर मतदारांचा कल निश्चित होणार आहे.

युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा लेंडीपट्टा मैदान येथे होणार असून, त्यासाठी तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एलिव्हेटेड रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी

भावनिक लाट की विकास?

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भावनिक लाट दिसत आहे. अजित पवार यांनी बारामतीचा विकास केला, हे अनेक मतदार उघडपणे बोलत आहेत. मात्र या विकासाच्या मागे शरद पवार आहेत, असेही बोलून दाखवित आहेत. अजित पवार यांच्याकडून मात्र सातत्याने बारामतीच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. भावनिक लाट की विकास, यावर या मतदारसंघाच्या निकालाचा कल निश्चित होणार आहे.

सांगता सभांची जोरदार तयारी

बारामतीच्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९६७ मध्ये सुरुवात केल्यापासून प्रचाराची सांगता सभा मिशन बंगला मैदान येथे होत असे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे मैदान मिळविल्याने सांगता सभेचे ठिकाण बदलावे लागले. त्याऐवजी मोरगाव रस्त्यावरील लेंडीपट्टा मैदान येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सांगता सभा घेण्यात आली होती. या वेळीही अजित पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा मिशन बंगला मैदानात, तर युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा लेंडीपट्टा मैदान येथे होणार आहे.

लोकसभेप्रमाणे अजित पवार विधानसभेच्या प्रचाराची सांगता मिशन बंगला मैदान येथे करणार आहेत. त्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे.

हेही वाचा – “भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?

बारामतीकर काय म्हणतात?

अजित पवार यांनी बारामतीत अनेक मोठे प्रकल्प आणून विकास केला. बारामतीच्या विकासात अजित पवार यांचा मोठा हातभार आहे. त्यामुळे मतदार हे त्यांच्या पाठीशी राहतील, असा अंदाज आहे. – नेमाजी वायसे, अंजणगाव, बारामती

बारामती म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार हे समीकरण आहे. पवार सांगतील, त्याप्रमाणे बारामतीकर निर्णय घेत आले आहेत. त्यामुळे सांगता सभेत शरद पवार काय सांगतात, याकडे लक्ष असणार आहे. – सतीश सावंत, बारामती शहर

पवार कुटुंबीयांतील मतभेदांमध्ये मतदारांची अडचण झाली आहे. शरद पवार यांच्याबरोबर बारामतीकर कायम राहिले आहेत. त्यांनी बारामतीच्या विकासाचा पाया रचला आहे. अजित पवार यांनी विकासाची परंपरा पुढे नेली. शेवटी निवडणुकीत कोणाचा तरी जय आणि पराजय होणार आहे. – एकनाथ सोडमिसे, सुपा, बारामती