पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलयाच्या इमारतीचे भूमिपूजन, महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन, उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. चिखली, जाधववाडी येथे होत असलेल्या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ यावेळी उपस्थित आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान केला जात होता. उपस्थित असलेले तरुण शिट्ट्या वाजवत होते. त्यामुळे अजित पवार संतापले. त्यांनी माइकचा ताबा घेतला. हा कार्यक्रम पोलिसांचा आहे. काय चालले आहे. शिट्ट्या कशाला वाजवता, शिट्ट्या वाजऊ नका, मुख्यमंत्री येथे आले आहेत. शिस्त आहे की नाही? आता शिट्ट्या वाजविल्या तर पोलिसांना उचलायला सांगेन असा इशारा अजित पवार यांनी दिला. त्यानंतर शिट्ट्या बंद झाल्या.
दरम्यान, पिंपरी येथील सुविधा भुखंडावर उभारण्यात येणारे मध्यवर्ती अग्निशमन केंद्र आणि अग्निशमन प्रबोधिनी इमारत, आकुर्डी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवन जवळ उभारण्यात येणारे अग्निशमन केंद्र, मधुबन हॉटेल ते इंदिरा रोड (२४ मीटर डी.पी रस्ता) व सिल्वर स्पून हॉटेल ते इंदिरा रोड (१८ मीटर डी.पी रस्ता) तसेच या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या वाकड शिवेपर्यंतचा १८ मीटर रुंदीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे दरम्यान जोडणारा पूल या विकासकामांचा समावेश आहे. भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) मध्ये विकसित केलेली संगणक प्रणाली तसेच चिंचवड येथील तालेरा रुग्णालयाची नवीन इमारत, शहरातील विविध ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ (वेस्ट टू वंडर) वस्तूंपासून निर्मिती केलेल्या टिकाऊ कलाकृती, महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींवर बसविण्यात आलेले रुफ टॉप सोलर सिस्टीम (सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प), सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन उपक्रम यांचा समावेश आहे.