वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक लावण्यात येऊ नये, असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिला असला तरी तो धुडकावत शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फलक, बॅनर लावण्यात येऊ नयेत. बॅनर, जाहिराती केल्याचे दिसल्यास पक्षाकडून त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे भाजपाकडून एका निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. तर वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधी करोना नियंत्रणासाठी द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मात्र तरीही शहरात होर्डिंग लावण्यात आले आहेत. यावर माध्यमांनी प्रश्न विचारले असता अजित पवार भडकले.
अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असतो. त्यानिमित्ताने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीचं वर्ष लक्षात घेता, भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकासपुरुष’ म्हणून होर्डिंग लावले गेले; या होर्डिंग्जला राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कारभारी लयभारी’ने उत्तर दिलं आहे. या पोस्टर वॉरची शहरभर चर्चा रंगली आहे. त्यावर उत्तर देताना अजित पवार चांगलेच भडकले.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुन्हेगारांनीही होर्डिग लावले असल्याचे पत्रकारांकडून विचारण्यात आले त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले,” गुन्हेगारांना होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का? आम्ही आमच्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरुन आवाहन केलं आहे. जर कोणी काही केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कधीच बंदी घालण्यात आलेली नाही. मी पिपंरी चिंचवडमध्ये आज आलेलो नाही. माझी मतं पिपंरी चिंचवडकरांना स्पष्ट माहित आहेत. तुम्ही काहीतरी नविन मुद्दा काढण्यासाठी प्रश्न काढायचा हे धंदे बंद करा. अनिधकृत होर्डिंग लावावं हे मी सांगितलं नाही. मी फार नियमांच पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग जर चूकीची लागली असतील तर भाजपाची इथे सत्ता आहे. तिथल्या आयुक्तांनी आणि महापौरांनी कारवाई करावी” असे अजित पवार म्हणाले.
पुण्यात पवार Vs फडणवीस होर्डिंग वॉर : ‘विकासपुरूष’ला ‘कारभारी लयभारी’ने प्रत्युत्तर
दरम्यान, दोन्ही नेत्यांनी हे आदेश दिल्यानंतरही शहरात जागोजागी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच नेत्यांचे आदेश धुडकाविल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रमुख चौकात, रस्त्यांवर फलक उभारून आपापल्या नेत्यांनी शहराचा विकास के ल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. कार्यकर्त्यांनी उभारलेल्या या शुभेच्छा फलकांवर महापालिकेकडून कारवाई होणार का, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.