बारामती : तब्बल दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघामध्ये आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शनिवारी बारामतीकरांनी जल्लोशात स्वागत केले. शहराच्या वेशीवर असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानापासून फुलांची उधळण करीत अजित पवार यांची उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. अजित पवार यांच्यासमवेत पुत्र पार्थ हेही उघड्या जीपमध्ये मतदारांचे स्वागत स्वीकारत होते. ‘साहेबां’पेक्षाही ‘दादां’च्या स्वागताला अधिक गर्दी झाली असल्याची चर्चा बारामतीकरांमध्ये रंगली होती.
उपमुख्यमंत्रीपदाची थपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचे बारामतीमध्ये पहिल्यांदाच आगमन झाले. बारामतीकरांनी अजित पवार यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांची ही पहिलीच बारामती भेट असल्याने कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी, संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पहार, पुष्पगुच्छ देत स्वागत केले. जेसीबी यंत्राच्या मदतीने अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण केली गेली. क्रेनद्वारेही त्यांना पुष्पहार घातले गेले.
हेही वाचा – पुणे: कॉलेज बंक करून वर्षाविहार करणे पडले महागात; दोन तरुणांचा कुंडमळ्यात बुडून मृत्यू
अजित पवार यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बँड, ढोलपथकाच्या निनादात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. संतोष गालिंदे आणि सहकाऱ्यांनी अजित पवार यांच्यावर दोन टनांहून अधिक फुलांची उधळण केली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागतकमानी लावून व्यापारी वर्गाने अजित पवार यांचे स्वागत केले. तालुक्याच्या विविध भागांतून तरुण दुचाकी रॅली काढून बारामतीच्या शारदा प्रांगणात दाखल झाले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, युवकाध्यक्ष अविनाश बांदल यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी या सत्कार सोहळ्याचे नियोजन केले होते.