शिरूर लोकसभेसाठी आमच्याकडे पर्यायी उमेदवार आहे. पुढच्या निवडणुकीत आमचा उमेदवारी आम्ही निवडूणच आणू, असे जाहीर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान देऊ केले आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे पदयात्रा काढणार आहेत. यासंबंधीचा प्रश्न अजित पवारांना विचारला असता त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. “निवडून आल्यानंतर दीड वर्षातच त्यांनी (कोल्हे) राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. आता निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांना पदयात्रा सूचत आहे”, असा आरोप अजित पवार यांनी केला.
हे वाचा >> “मोदींच्या विरोधात चेहरा…”, सी-व्होटर सर्व्हेच्या अंदाजावर अजित पवारांची टीका
“शिरुरच्या खासदाराने पाच वर्ष स्वतःच्या मतदारसंघात लक्ष दिले असते तर खूप बरे झाले असते. त्या खासदारांनी दीड वर्षापूर्वी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचे रान केलेले होते. त्यांना खासगीत समोरासमोर बोलवा, मग आम्ही काय ते सांगू. ते मधल्या काळात त्यांच्या लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघात फिरकतही नव्हते. तसेच त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. मी एक कलावंत असून माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा फ्लॉप गेला. माझ्या कुटुंबावर आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाल्याचे या खासदारांनी आम्हाला सांगितले होते. मी हे कधी बोलणार नव्हतो. पण निवडणूक आल्यामुळे त्यांना एक एक गोष्टी सुचायला लागल्या आहेत. त्यामुळे बोलायला लागत आहे”, अशा शब्दात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.
पुण्यात माध्यमांशी बोलत असताना अजित पवार पुढे म्हणाले की, कुणाला संघर्ष यात्रा सुचतेय, कुणाला पदयात्रा सुचतेय. आता काहीही काढा. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापली भूमिका घेण्याचा अधिकार आहे. मीदेखील शिरूर लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात जाऊन लोकांना आवाहन करणार आहे की, विद्यमान खासदारांना तुम्ही कितींदा मतदारसंघात पाहिले ते सांगा.
“मागच्या वेळी उमेदवारी देत असताना आम्ही योग्य व्यक्तीला उमेदवारी दिली होती. पण नंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली. निवडून आल्यानंतर मतदारसंघात फिरावं लागतं, लोकांची कामं करावी लागतात. पण हे खासदार पहिल्या वर्षातच ढेपाळले आणि राजीनाम्याची गोष्ट करू लागले. आम्हाला वाटलं त्यांचं वक्तृत्व चांगले आहे, उत्तम कलाकार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी उत्तमरित्या निभावली होती. त्यांच्या मालिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिली. पण आता शिरूर लोकसभेसाठी आमच्याकडे पर्यायी उमेदवार आहे. पुढच्या निवडणुकीत आमचा उमेदवारी आम्ही निवडूणच आणू”, असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिले.