आज माझ्यावर पोराला निवडून द्या म्हणण्याची वेळ आलीय, त्यामुळे पार्थला साथ द्या असे भावनिक आवाहन अजित पवार यांच्या पहिल्या प्रचार सभेत रविवारी केलं. मावळ येथे रविवारी लोकसभेच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, निवडणुकीदरम्यान कोणी मॅच फिक्सिंग करायची नाही. रात्री एक आणि दिवसा एक असं केलं तर खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना अक्षरशः तंबीच दिली. १९८५ साली पवार साहेबांनी या भागाचे नेतृत्व दिल्लीत केलं होत. तेव्हा देशात दोन नंबरच्या मताने पवार साहेब निवडून आले. १९९१ साली माझी पाटी कोरी होती, तेव्हा शाम वाल्हेकरांनी केलेलं भाषण ऐकून मी निम्मा गार झालो होतो, अशी आठवण यावेळी त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
पवार पुढे म्हणाले, नितीन गडकरी म्हणतात सरकारमध्ये मला काम करू दिल जात नाही. तसेच सुषमा स्वराज, उमा भारती निवडणूक लढवणार नाही असं म्हणतात याचा काय अर्थ, असा जनतेला प्रश्न विचारत भाजपाची हुकूमशाही खपवून घेऊ नका, असा सल्ला अजित पवारांनी यावेळी उपस्थितांना दिला.