भलत्याच मूडमध्ये आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूरच्या ‘त्या’ सभेत ‘नको ते’ बरळले आणि व्हायचे तेच झाले. पवारांच्या भाषणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले व त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली. त्यामुळे रविवारी आयोजित करण्यात आलेला पिंपरी-चिंचवडचा दौरा त्यांनी रद्द केला.
पिंपरी पालिकेच्या वतीने एचए कंपनीच्या मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसांपासून सुरू असलेल्या या दौऱ्याचा समारोप अजितदादांच्या उपस्थितीत रविवारी होणार होता. त्याचप्रमाणे,पिंपरी पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत एका महत्त्वपूर्ण बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील विकासकामांचा आढावा घेतानाच अजित पवार मार्गदर्शनही करणार होते. मात्र, त्यांनी आपला दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
शनिवारी अजितदादांच्या हस्ते इंदापूरच्या विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात अजितदादांनी पाणी व विजेच्या बाबतीत बोलताना नको ती उदाहरणे दिली. त्या भाषणाचे प्रसारण वाहिन्यांवरून सुरू होताच राजकीय वर्तुळात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी अजितदादांवर कडाडून हल्ला सुरू केला. अशा प्रतिकूल वातावरणात ते शहरात येणार का, याविषयी सकाळपासूनच साशंकता होती. अपेक्षेप्रमाणे अजितदादांनी आपला दौरा रद्द केला व कार्यक्रम उरकून घ्या, असा निरोप त्यांनी स्थानिक नेत्यांना दिल्याचे सांगण्यात आले.