महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तडफदार नेते, राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण खुद्द अजित पवार यांनी दिले आहे. ‘तात्या, कधी येता, वाट पहातोय’, अशा शब्दात अजित पवार यांनी मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या या प्रस्तावाला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला. मात्र पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची आमदार निलेश लंके यांच्या समवेत भेट झाली होती. वसंत मोरे नाराज असल्याने ते मनसेला रामराम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी त्याला विरोध केला होता. तेव्हापासून शहर पदाधिकारी विरोधात वसंत मोरे असे चित्र दिसण्यास सुरुवात झाली आहे. मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही यापूर्वी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते.
वसंत मोरे यांनी पक्षाच्या सुकाणू समितीच्या (कोअर कमिटी) कार्यपद्धतीवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती. या दरम्यान अजित पवार यांनी वसंत मोरे यांना थेट प्रस्ताव दिल्याने वसंत मोरे पक्ष प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. शहरातील एका विवाह सोहळ्यासाठी वसंत मोरे आणि अजित पवार उपस्थित होते. या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केल्यानंतर ‘तात्या, कधी येताय, वाट पहातो,’ अशी विचारणा अजित पवार यांनी केली.
हेही वाचा- पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ
अजित पवार यांनी जाहीर नियमंत्रण दिल्याला वसंत मोरे यांनी ही दुजोरा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अशी विचारणा करतात, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तसेच माझ्या कार्याचीही पावती आहे. मात्र मनसे सोडण्याबाबत मी विचार केलेला नाही, असे मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून शहर मनसेमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. गट प्रमुखांच्या कार्यक्रमात वसंत मोरे यांना बोलू न दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे हे वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचीही या पदावरून अध्यक्ष राज ठाकरे यांनी हकालपट्टी केली आहे. काही महिन्यांपूर्वीच निलेश माझिरे यांनी संघटनेतील अंतर्गत राजकारणाबाबत आपली नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला होता. मात्र, माझिरे यांची समजूत काढण्यात आली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या हकालपट्टीमुळे मनसे पक्षसंघटनेत त्याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा- भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कटकारस्थान; नाना पटोले यांची टीका
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासंदर्भात भूमिका घेतल्यानंतर या आदेशाचे पालन केले जाणार नाही, अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांची पक्षाच्या शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या ऐवजी माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना शहराध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते.