लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: राज्यातील सत्तेत अजित पवार सहभागी होताच त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने पार्थ आणि जय उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे स्पर्धेच्या निमित्ताने जनसंपर्क वाढविण्यास या दोघांची सुरुवात झाली असून, त्यांच्या सक्रिय राजकारणाचे संकेत मिळत असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थ खाते देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यातील सत्ता समीकरणेही झपाट्याने बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे दोन्ही चिरंजीव पार्थ आणि जय हे राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी धीरज घाटे

पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात काही कार्यक्रमांना पार्थ उपस्थित होते. मात्र त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून बाजूला झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्या वेळी जय पवार अजित पवार यांच्यासमवेत दिसून आले होते. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत पार्थ आणि जय पवार सक्रिय राजकारणात उतरले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा… पुणे: चित्रपटगृहात महिलेशी अश्लील वर्तन; तिघे अटकेत

पार्थ आणि जय पवार हे दोघे प्रथमच एका व्यासपीठावर मंगळवारी आले. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बालेवाडी येथील क्रीडा संकुलात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन या दोघांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या निमित्ताने जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत पार्थ आणि जय राजकीय व्यासपीठावर दिसतील, अशी चर्चा अजित पवार समर्थकांमध्ये सुरू झाली आहे.