पिंपरी : चिंचवड शहर हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून आजही ओळखला जातो. मात्र, याच बालेकिल्ल्यातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांचे विश्वासू चिंचवड विधानसभा इच्छुक भाऊसाहेब भोईर यांनी आज बंड करत चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. ते आगामी विधानसभा अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. तसा निर्धार त्यांनी मेळावा घेऊन केला. पिंपरी- चिंचवड शहरात अजित पवारांनी सरड्याचे डायनासोर केले असा हल्लाबोल देखील केला आहे. माझ्यावर कुठल्याही पातळीवर जाऊन टीका केल्यास मी त्या व्यक्तीला सोडणार नाही. माझ्याकडे अनेक जणांच्या कुंडल्या आहेत. असं म्हणत भोईर यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांना इशारा दिला आहे.
भाऊसाहेब भोईर हे पाच वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. २००९ ला विधानसभा आणि २०१४ ला लोकसभा निवडणूक लढलेल्या भाऊसाहेब भोईर यांना अजित पवार आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळे पराभूत व्हावं लागलं होतं. अस ते स्वतः सांगतात.
हे ही वाचा…जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका
भाऊसाहेब भोईर म्हणाले, २००९ला मला तिकीट देऊन माझा कार्यक्रम केला. वेळोवेळी पक्षाने माझ्यावर अन्याय केला. कुठलेही पद मला दिलं नाही. शहरात अजित पवार यांनी सरड्याचे डायनासोर तयार केले. २०१४ ला लोकसभेचे तिकीट द्यायचं ठरलं. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शेकपाकडून उभा राहिले. त्यावेळी देखील माझा पराभव झाला. पुढे ते म्हणाले, काल एकाचा फोन आला तू उभा राहिल्यास २५ काय ५० खर्च करु. यांचं समीकरण आहे. सत्तेतून पैसा आणि पैशांमधून सत्ता. पैशांमुळे मी निवडून येऊ शकतो अशी मानसिकता नेत्यांची झाली आहे. विरोधकांना सांगतो. मी आहे तसा राहू द्या. माझ्या कार्यकर्त्यांना कुणीही दम देऊ नका. पुढे ते म्हणाले, मी आमदार झाल्यावर दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या आत्म्याला शांती मिळेल. चिंचवड पोटनिवडणुकीत मी उमेदवारी मागितली होती. चिंचवड लोकसभेचे पुन्हा एकदा तिकीट कट केलं. म्हणाले सर्वेत तुझं नाव नाही. पुढे ते म्हणाले, मी कोणाचं नाव घेतलं नाही. माझ्याकडे अनेक जणांच्या कुंडल्या आहेत. माझ्यावर कुठल्याही पातळीवर जाऊन टीका केली तर मी सोडणार नाही. माझा कार्यक्रम करण्यासाठी दिवंगत लक्ष्मण जगताप उभा राहिले होते. आता यांचा कार्यक्रम करण्यासाठी मी अपक्ष उभारणार. आता यांना पाणी पाजणार आहे.