अनधिकृत बांधकामांविषयी निर्णय होत नसल्याने हवालदिल झालेले आमदार, महापौर मोहिनी लांडे यांच्या राजीनाम्याची इच्छुक नगरसेविकांची आग्रही मागणी, शहराध्यक्ष-पक्षनेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, नियमावर बोट ठेवून काम करण्याच्या आयुक्तांच्या पद्धतीने होणारी ‘अडचण’ अशा अनेक कारणांनी सत्तारूढ राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. या सर्व दुखण्यांचा इलाज अजितदादांकडेच असून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या त्यांच्या दौऱ्यात बऱ्याच घडामोडी होण्याची चिन्हे आहेत.
पिंपरी पालिकेच्या रखडलेल्या प्रकल्पांची तसेच अन्य विकासकामांची माहिती अजितदादांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी करून घेतली. त्यानंतर, कामांचा वेग वाढवण्याचे आदेश त्यांनी आयुक्त व पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यापाठोपाठ, गुरुवारी ते विविध कार्यक्रमांसाठी शहरात येत आहेत. औंध रुग्णालयात अद्ययावत अतिदक्षता विभाग, डायलेसिस विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण केंद्र व सुसज्ज वसतिगृहाचे भूमिपूजन अजितदादांच्या हस्ते दुपारी दीड वाजता होणार आहे. या वेळी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता पालिकेच्या ‘सारथी’ या हेल्पलाईनचे उद्घाटन व माहितीपुस्तिकेचे प्रकाशन अ‍ॅटो क्लस्टर सभागृहात होणार आहे. या वेळी महापौर मोहिनी लांडे, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर, भोसरीत महापारेषण कंपनीचा कार्यक्रम आमदार विलास लांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
अजितदादांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीतील घडामोडींनी वेग घेतला आहे. मोहिनी लांडे यांना महापौरपदी अघोषित मुदतवाढ मिळाल्याचे चित्र निर्माण झाल्याने अन्य इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. झामाबाई बारणे, नंदा ताकवणे, शमीम पठाण या ज्येष्ठांसह नव्या नगरसेविकांनी महापौरपदावर दावा केला आहे. त्याचे पडसाद दौऱ्यात अपेक्षित आहेत. अनधिकृत बांधकामांच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी रान पेटवले असताना निर्णय होत नसल्याने तीनही आमदार अस्वस्थ आहेत. या विषयीचा निर्णय झाला नाही तर राजीनामा देण्याची अथवा पुन्हा निवडणूक न लढवण्याची भाषा त्यांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे संघटनात्मक काम विस्कळीत आहे. शहराध्यक्षांचे पक्षापेक्षा व्यक्तिगत उद्योगधंद्यांकडे अधिक लक्ष असल्याच्या नगरसेवकांच्या व कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. तर, पक्षनेत्यांविषयी महिला नगरसेवक तसेच नव्या नगरसेवकांमध्ये तक्रारींचा सूर आहे. आयुक्तांची कार्यपद्धती पचनी पडत नसल्याने असलेली अस्वस्थता राष्ट्रवादीत कायमच आहे. विधानसभा व लोकसभेसाठी अजितदादांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना हक्काच्या पिंपरी बालेकिल्ल्यातच धुसफूस असल्याने त्याची अजितदादांना वेळीच दखल घ्यावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा