पुणे : उद्योगांना धमकावलेल्यांवर गृहमंत्र्यांनी तातडीने कारवाई करून त्यांच्यावर ‘मोक्का’ लावावा. राज्याच्या गृहमंत्र्यांनी केवळ बोलून उपयोग नाही, तर कारवाई करावी, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांमुळे तरुणांना काम, आर्थिक सुबत्ता येणार असताना ते प्रकल्प बाहेर घालवले जात असल्यास त्याला ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणायचे का, असेही पवार म्हणाले.
अजित पवार यांनी एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पुण्यातील दोन हजार कोटींच्या विकासकामांना मान्यता दिल्याबाबत पवार म्हणाले, की अर्थमंत्री असताना पुण्याला काही कमी पडू दिले नाही. आता नवे अर्थमंत्रीही काही कमी पडू देणार नाही म्हणत आहेत. पण महाराष्ट्राला काही कमी पडू देऊ नका आणि पुण्यालाही काही कमी पडू देऊ नका. पण जिल्हा वार्षिक योजनेचा दिलेला निधी किती टक्के खर्च झाला आहे, आता केवळ दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे बाकीच्या गोष्टी सांभाळत बसण्यापेक्षा विकास कामांसाठी दिलेला निधी कुणाच्या नाकर्तेपणामुळे खर्च होऊ शकत नाही, कशामुळे विलंब होत आहे याचीही माहिती अर्थमंत्र्यांनी घ्यावी.
पदवीधर उमेदवारीबाबत अजित पवार म्हणाले की, उमेदवारीबाबत मोठ्या प्रमाणात गडबड होणार असल्याची कल्पना बाळासाहेब थोरात यांना आधीच दिली होती. सहकारी म्हणून काम करताना जे काही कानावर येते ते लक्षात आणून दिले होते. आता या संदर्भात अन्य सहकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल.
गृहमंत्र्यांनी केवळ बोलण्यापेक्षा कारवाई करावी
तांबे यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून एकटा भूमिका घेऊ शकत नाही. जयंत पाटील, भुजबळ, तटकरे आम्ही एकत्र बसून काय भूमिका घ्यायची, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेऊन ठरवले जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांचा फडणविसांना टोला
पुण्यातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री न आल्याबाबत पवार म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना मुंबईत अधिक महत्त्वाचे काम असू शकते. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे मुख्यालय मुंबई आहे. आपलेच सहकारी उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला जात आहेत, तर आपण मुंबईतील काम करूया, असा विचार त्यांनी केला असेल.