‘सर्कस’, ‘पंजाबी पेहेराव करोनी फिरे मराठी नार’ या दोन कविता तरुणाईचा लाडका कवी संदीप खरे याने सादर केल्या आणि ५८ वर्षांपूर्वीच्या गदिमांच्या या कविता ऐकताना रसिकांना कॅमेरा फिरावा अशा चित्रमय शब्दसृष्टीचा प्रत्यय आला. कवी हा पिढय़ानपिढय़ा जगतो. आमच्या मराठी भाषेमध्ये आणि संस्कृतीमध्ये गदिमा अजूनही आहेत, अशी भावना साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मंगळवारी व्यक्त केली.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे ग. दि. माडगूळकर यांच्या अप्रकाशित कवितांचा समावेश असलेल्या ‘अजून गदिमा’ आणि गजलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘मैं शायर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ विचारवंत अनिस चिश्ती, कवी संदीप खरे, ‘अजून गदिमा’ संग्रहाचे संपादक श्रीधर माडगूळकर आणि प्रकाशिका देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर या वेळी उपस्थित होत्या.
गदिमा कुठे नव्हते. ते स्वातंत्र्य चळवळीत होते. काँग्रेसमध्ये होते. सामाजिक चळवळीत होते. लेखक रस्त्यावर उतरला पाहिजे ही त्यांची धारणा होती, असे सांगून कोत्तापल्ले म्हणाले, चित्रपटासाठी गाणी लिहिणे म्हणजे गीतकार असे नव्हे. तर, संगीतकाराला चाल सुचावी असे लिहिणारा तो खरा गीतकार. असे गीतलेखन करणाऱ्या गदिमांनी मराठी आणि हिंदूी चित्रपटांसाठी कथा-पटकथा लेखन केले. चित्रपटामधील धंदेवाईक लोकांनी मोठय़ा लेखकांना दूर केल्यामुळे मराठी चित्रपट रसिकांपासून दूर गेले.
बांगला देशाच्या निर्मितीनंतर पुण्याच्या रेसकोर्सवर इंदिरा गांधी यांच्या झालेल्या सभेसाठी स्वागतगीत लिहिणारे गदिमा आणि या गीताच्या तालमी गदिमांसमवेत पाहण्याचे भाग्य लाभले हीच माझी श्रीमंती, अशी भावना उल्हास पवार यांनी व्यक्त केली. गदिमा हे मराठी मातीमध्ये भिनलेले कवी अशी भावना व्यक्त करून संदीप खरे याने हा खजिना दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे, असे सांगितले. आपले जीवन प्रकाशमय करण्यासाठी भाषांमधील भिंती दूर केल्या पाहिजेत, असे सांगून अनिस चिश्ती यांनी निफाडकर यांच्या पुस्तकाने मराठी आणि उर्दू साहित्यामध्ये भर घातली असल्याचे मत व्यक्त केले. श्रीधर माडगूळकर आणि प्रदीप निफाडकर यांनी मनोगत व्यक्त केले. देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
संदीप खरे याच्या कवितावाचनातून उलगडली गदिमांची चित्रमय शब्दसृष्टी
कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे ग. दि. मा. यांच्या अप्रकाशित कवितांचा समावेश असलेल्या ‘अजून गदिमा’ व गजलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘मैं शायर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-10-2013 at 02:55 IST
TOPICSप्रकाशित
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajun gadima and main shayar two books published by nagnath kottapalle