पिंपरी : एकजुटीनं .. दुरदृष्टिनं चला गाजवू मैदान.., राष्ट्रहितासाठी करायचं मतदान..,  लोकशाहीचा करायचा सन्मान..,१०० टक्के हो करायच मतदान.., लोकशाहीचा करायचा सन्मान.. हा वासुदेवांचा आवाज अलीकडे मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी घुमत असल्याचे दिसते. निमित्त आहे लोकसभा निवडणुकीचे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून शहराच्या विविध भागात ही मतदान जनजागृती होत आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्याचे मतदान पार पडले मात्र त्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते आहे. मावळ लोकसभा मतदार संघात मतदारांना मतदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी अ. भा. नाट्य परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदान जनजागृती करत असलेले वासुदेव हे नाट्यकर्मी नसून खरेखुरे वासुदेव आहेत. त्यांच्या मार्फतलोक गीतांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

हेही वाचा…धक्कादायक : पत्नी, सासूला धडा शिकवण्यासाठी १५ दुचाकी जाळल्या

शहरातील नव मतदार असलेल्या तरुणाईने मतदानासाठी घराबाहेर पडावे,  आपण मतदान केले नाही तर काय फरक पडतो? अशी भूमिका काही लोक घेत असतात त्यांनाही मतदान केंद्रापर्यंत जा, मतदान करून आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन हे वासुदेव करत आहेत. शहरातील उद्याने, सोसायट्या आणि विविध भागात सकाळी ६ ते १० या वेळेत ही जनजागृती करण्यात येत आहे. या मतदान जनजागृती साठी वासुदेवांना मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गांचे नियोजन आदी बाबी नाट्य परिषदेच्या वतीने राजेंद्र बंग, आसाराम कसबे, संतोष रासने सांभाळत असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhil bharatiya marathi natya parishad spreads voting awareness in pimpri chinchwad for maval lok sabha constituency pune print news ggy 03 psg