पुणे : ‘साहित्य व्यवहारात महत्त्वाचे स्थान असलेल्या समीक्षेचे अध:पतन होते तेव्हा समाजाचे अध:पतन होते. आज साहित्याची समीक्षा गटातटात विभागली गेली असून, सध्या प्रकाशक-लेखक आणि समीक्षकांनी एकत्र येऊन वाचकांना फसवण्याचे प्रकार सुरू आहेत,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी व्यक्त केले.

‘अक्षर वाङ्मय’च्या वतीने ‘सुधीर रसाळ विशेषांका’चे प्रकाशन राजहंस प्रकाशनचे संचालक दिलीप माजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी जोशी बोलत होते. कवी प्रा. इंद्रजित भालेराव, विशेषांकाचे संपादक डॉ. अरूण प्रभुणे, प्रकाशक डॉ. नानासाहेब सूर्यवंशी या वेळी उपस्थित होते.

जोशी म्हणाले, ‘उत्तम कलाकृतींच्या सृजनाला प्रोत्साहन देणे आणि दुय्यम कलाकृतींचे हनन करणे हा समीक्षेचा धर्म असतो. तटस्थ आणि परखड समीक्षक आता हरवले असून पुस्तक परीक्षणे लिहिणारे समीक्षक झाले आहेत. इथल्या मातीतून-संस्कृतीतून आलेल्या साहित्याकडे समीक्षेने दुर्लक्ष केलेले दिसते. युगंधर आणि मृत्युंजयसारख्या लोकप्रिय साहित्यकृती दुर्लक्षित राहिल्या. समीक्षेच्या प्रांतात समग्रतेचे भान यायला हवे.’

‘सुधीर रसाळ हेे गंभीरपणे ज्ञानव्यवहार करणारे समीक्षक आहेत. नैतिक आणि वाङ्मयीन मूल्यांशी तडजोड न करता रसाळांनी समीक्षेचा व्यवहार केला. त्यांच्या समीक्षेत परखडता दिसते. तटस्थपणे साहित्यातील गुणदोष उलगडण्याचे काम रसाळांनी केले,’ असे जोशी यांनी सांगितले. भालेराव म्हणाले,‘रसाळांनी समीक्षक आणि साहित्यिक म्हणून केलेले काम अत्यंत मोलाचे आहे. लोकप्रिय कलाकृतींची समीक्षा करतानाच त्यांनी नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले.’

साहित्यकृतीने वाचकांना आनंद द्यावा. तसेच साहित्यकृतींच्या समीक्षात्मक मूल्यमापनासाठी वाचकांचीही पूर्वतयारी हवी. सुधीर रसाळ यांचे ललित अंगाने केलेले व्यक्तिचित्रणात्मक लेखन उत्तम आहेच, पण त्यांचा मूळ पिंड समीक्षेचाच आहे. आत्मीयतेने ललित शैलीतील व्यक्तिचित्रणात्मक लेखन करणारे रसाळ समीक्षात्मक लेखन करताना काहीसे अनवट, बोजड व क्लिष्ट का होतात, असा प्रश्न मला पडतो.- दिलीप माजगावकर, संचालक, राजहंस प्रकाशन