ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेतल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून अनेक साहित्यिकांनी यवतमाळ संमेलनाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर, साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून आपल्या अध्यक्षीय भाषणात याविषयी भाष्य करणार असल्याचे संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी सांगितले.
यवतमाळ येथील साहित्यसंमेलनाच्या उद्घाटक असलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या घटनेमुळे केवळ साहित्य महामंडळाचाच नाही तर मराठी भाषेचा अवमान झाला असल्याची तीव्र भावना व्यक्त केली जात आहे. समाजमाध्यमांवर या घटनेचे पडसाद उमटले असून, लेखक आणि वाङ्मयीन कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. यवतमाळ येथे शुक्रवारपासून (११ जानेवारी) तीन दिवस ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन होणार आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार होते. मात्र, इंग्रजी लेखक या मुद्दय़ावर झालेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर सहगल यांचे निमंत्रण मागे घेतल्याची चर्चा रविवारी (६ जानेवारी) सुरू झाली. मात्र, सहगल यांच्या भाषणामध्ये सध्याच्या राजकीय वास्तवावर भाष्य असल्याने हे मुद्दे सरकारला अडचणीत आणू शकतात, या मुद्दय़ावर सहगल यांना उद्घाटक म्हणून येऊ नका, असे ई-मेलद्वारे कळविण्यात आले, अशीही चर्चा सुरू झाली. त्यानंतर सहगल यांचे निमंत्रण नेमके का मागे घेतले या बाबत साहित्य महामंडळ टोलवाटोलवी करत असल्याची टीका सुरू झाली. या घटनेचे समाजमाध्यमांवर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
‘आयोजक तुम्ही चुकत आहात’ याच शब्दांत मी संमेलनाच्या आयोजकांची खरडपट्टी काढणार असल्याचे विद्यमान साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले. ‘राजा, तू चुकतो आहेस. सुधारले पाहिजे’, अशा शब्दांत देशमुख यांनी बडोदा येथील साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून सरकारला ठणकावले होते.
सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्याची घडलेली घटना चुकीची आहे. लेखक म्हणून मला त्याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली. प्रकृती ठीक नसल्यामुळे या संमेलनाला उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्यसंमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देऊन नंतर ते रद्द करणे म्हणजे नेभळटपणा असून, त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी यवतमाळ येथील संमेलनाला आपण जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलवा, असे त्यांनी म्हटले नव्हते. तुम्हीच बोलावले होते, अशा शब्दांत त्यांनी आयोजकांवर टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाऱ्याने दिलेल्या धमकीवरून नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करणे हा मराठी संस्कृतीचा अपमान आहे. राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद, पण कोणत्याही पक्षाची राजकीय झुंडशाही महाराष्ट्राला परवडणारी नाही, अशा शब्दांत टीका करून माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्याला निमंत्रण आलेले नसल्याने संमेलनाला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मराठी सभ्यतेमध्ये हे योग्य नाही. सहगल या मूळ मराठी आहेत. आंतरभारती संकल्पनेमध्ये मराठीला कोणत्याही भाषेचा विटाळ नाही. मराठी संस्कृती ही ज्ञानेश्वरांच्या विश्वात्मक संतत्वाने प्रेरित झाली आहे, असेही सबनीस यांनी सांगितले.
संयोजकांनी नयनतारा सहगल यांची दिलगिरी व्यक्त करून सन्मानाने पुन्हा निमंत्रित करावे, तरच हे संमेलन सुरळीत पार पडेल’, अशी मागणी लेखक आशुतोष जावडेकर यांनी केली आहे. या संमेलनाला मी जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. संमेलनातील ‘ललित गद्य’ परिसंवादाचे ते समन्वयक होते.
‘साहित्यसंमेलनाचे विचारपीठ हे लेखक आणि वाचकांचे आहे, तेव्हा उद्घाटन समारंभाच्या दिवशी (११ जानेवारी) संमेलनस्थळी निषेध नोंदवावा’, असे आवाहन छायाचित्रकार आणि दक्षिणायन चळवळीचे संदेश भंडारे यांनी केले आहे. यवतमाळ आणि विदर्भातील साहित्यिकांना सहगल यांच्या भाषणाच्या प्रती वाटाव्यात. यामध्ये नकार दिलेले आमंत्रित सहभागी झाले तर आपल्या म्हणण्याला अधिक बळ येईल, असेही भंडारे यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून ज्येष्ठ लेखिका-सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, कवी गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे यांच्यासह अनेक लेखक-कवींनी संमेलनाला उपस्थित न राहण्याची भूमिका घेतली आहे.
संमेलनाच्या व्यासपीठावरूनच
संमेलनाच्या व्यासपीठावरूनच आपल्या अध्यक्षीय भाषणातून या विषयावर भाष्य करणार असल्याचे नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी सांगितले. नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय घेताना आपल्याला कोणत्याही स्वरूपाची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.