साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण रद्द करण्यावरून महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यातील लेखक, पत्रकार मंडळींनीही या घटनेचा निषेध केला आहे. साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी यावरून कडाडून टीका केली आहे. नयनतारा सहगल यांना उद्घाटनाचे निमंत्रण देऊन नंतर ते रद्द करणे म्हणजे नेभळटपणा असून त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे, अशी प्रतिक्रिया कोत्तापल्ले यांनी दिली आहे. तसेच यवतमाळ येथील संमेलनाला आपण जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोत्तापल्ले म्हणाले की, सहगल यांच्याबाबतीत अत्यंत चुकीचे घडले आहे. त्या मुळच्या महाराष्ट्रातील आहेत. त्यांचे वडील महाराष्ट्रीयन तसेच संस्कृत पंडित होते. संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलवा, असे त्यांनी म्हटले नव्हते. तुम्हीच बोलावले होते. एकदा निमंत्रण दिल्यानंतर ते रद्द करणे नेभळटपणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लखनौ येथे आमंत्रण देऊन नंतर ते रद्द करण्याची घटना घडली होती. तशाच पद्धतीची ही घटना आहे. कोणत्याही मुल्यात हा प्रकार बसत नाही. याचा निषेध व्यक्त करत संमेलनाला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नयनतारा सहगल यांना कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. नयनतारा सहगल यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेत एक वाहक असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. आयोजकांनी संमेलन उधळले जाईल म्हणून सहगल यांचे निमंत्रण रद्द केले होते.