घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. संमेलनाध्यक्षपदासाठी नाव सुचविण्याची मुदत मंगळवारी संपली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ३० सप्टेंबर ही मुदत असल्याने त्याचदिवशी अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. अशोक कामत यांच्यासह ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचविणारे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाले आहेत. तर, महानुभाव साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक पुरुषोत्तम चंद्रभानजी नागपुरे यांचे नाव सुचविणारा अर्ज विदर्भ साहित्य संघाकडे दाखल झाला आहे. सासणे यांचे नाव सुचविणारे अर्ज साहित्य महामंडळाच्या चारही घटक संस्थांकडे आले असून मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज सोमवारी मराठवाडा साहित्य परिषदेकडे दाखल झाला होता, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी दिली.
डॉ. सदानंद मोरे, डॉ. अशोक कामत आणि भारत सासणे यांची नावे सुचविणारे असे तीन अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाले आहेत. त्यामुळे ही तीन नावे परिषदेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला कळविली आहेत, असे परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. चौथ्या नावाचा अर्ज न आल्यामुळे कोणाचे नाव वगळायचे या संकटातून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची सुटका झाली आहे.
साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात
घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
First published on: 24-09-2014 at 02:50 IST
TOPICSघुमान
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhil bharatiya marathi sahitya sammelan ghuman candidate