घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. संमेलनाध्यक्षपदासाठी नाव सुचविण्याची मुदत मंगळवारी संपली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ३० सप्टेंबर ही मुदत असल्याने त्याचदिवशी अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. अशोक कामत यांच्यासह ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचविणारे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाले आहेत. तर, महानुभाव साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक पुरुषोत्तम चंद्रभानजी नागपुरे यांचे नाव सुचविणारा अर्ज विदर्भ साहित्य संघाकडे दाखल झाला आहे. सासणे यांचे नाव सुचविणारे अर्ज साहित्य महामंडळाच्या चारही घटक संस्थांकडे आले असून मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज सोमवारी मराठवाडा साहित्य परिषदेकडे दाखल झाला होता, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी दिली.
डॉ. सदानंद मोरे, डॉ. अशोक कामत आणि भारत सासणे यांची नावे सुचविणारे असे तीन अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाले आहेत. त्यामुळे ही तीन नावे परिषदेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला कळविली आहेत, असे परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. चौथ्या नावाचा अर्ज न आल्यामुळे कोणाचे नाव वगळायचे या संकटातून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची सुटका झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा