पहिल्या ग्रंथकार संमेलनापासून वाटचाल

भारतीय भाषांमध्ये वैभव वाटावे अशा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या अनोख्या चळवळीची दीडशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पुण्यामध्ये भरलेले पहिले ग्रंथकार संमेलन ही घटना शुक्रवारी (१२ मे) १४० व्या वर्षांत पदार्पण करीत असताना भाषा, साहित्य आणि संस्कृतीची जोपासना करणाऱ्या मराठीच्या या वैशिष्टय़ाचे अन्य प्रादेशिक भाषांमध्येही अनुकरण झाले आहे.

न्या. महादेव गोविंद रानडे यांनी १२ मे १८७८ रोजी पुण्यामध्ये ग्रंथकार संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. या पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्षपद रानडे यांनी भूषविले होते. हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ होता. स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर १९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही संस्था अस्तित्वात आली. या संस्थेमार्फत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. पहिल्या ग्रंथकार संमेलनानंतर गेल्या १३९ वर्षांमध्ये आतापर्यंत ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. या संमेलनांच्या माध्यमातून मराठी भाषा आणि साहित्य याचा पट विस्तारला आहे, याकडे मराठी भाषेचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी लक्ष वेधले.

ग्रंथकार संमेलन सुरू करण्यामागचा इतिहास सांगताना डॉ. मोरे म्हणाले, की त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ अस्तित्वात होते. या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी हा विषय नव्हता. त्यामुळे मराठीमध्ये उत्तम दर्जाची सकस साहित्यनिर्मिती होत आहे आणि मराठीमध्ये वाङ्मयाच्या निकषामध्ये बसू शकतील अशी साहित्यसंपदा आहे हे दाखवून देण्याच्या उद्देशातून न्या. रानडे यांनी ग्रंथकार संमेलनाचा प्रपंच सुरू केला. हे त्याकाळचे मर्यादित उद्दिष्ट ध्यानात घेतले, तर ग्रंथकार संमेलन सुरू करण्यामागचा त्यांचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. याचे कारण ग्रंथकार संमेलन सुरू झाल्यानंतर विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये मराठीचा अंतर्भाव करण्यात आला. मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनाच्यादृष्टीने रानडे यांचे हे कार्य महत्त्वाचे आहे.

सध्या होत असलेल्या वादांच्या पाश्र्वभूमीवर साहित्य संमेलन सुरू राहील का, असे विचारले असता डॉ. मोरे म्हणाले, की साहित्य संमेलन हा मराठी भाषेचा उत्सव आहे. त्यामुळे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान आपल्याला लाभावा, अशी लेखकांची अपेक्षा असण्यात काही गैर नाही. त्यामुळे वादविवाद आणि टीकाटिप्पण्या झाल्या तरी साहित्य संमेलनाची प्रथा सुरूच राहील. जोपर्यंत भाषा अस्तित्वात आहे आणि साहित्यनिर्मिती होत आहे तोपर्यंत साहित्य संमेलन ही परंपरा सुरूच राहील. संमेलनाच्यानिमित्ताने जे वातावरण निर्माण होते त्याने साहित्यप्रेमी मराठी भारावून जातात. अशा लोकांना अंतर्गत राजकारणामध्ये कोणताही रस नसतो. ते केवळ भाषेच्या आणि साहित्याच्या प्रेमापोटी संमेलनामध्ये सहभागी होतात.

साहित्य निर्मितीला संमेलनाची मदत

साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य निर्मितीला मदतच होत आहे, असे डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले. पण, त्याच्या विस्ताराचे मापदंड नेमकेपणाने सांगता येणे अवघड आहे. सध्या ज्या लेखनाला डोक्यावर घेतले जाते ते तुलनेने सामान्य दर्जाचे आहे याची जाणीव २५ वर्षांनंतर होऊ शकते. त्याचप्रमाणे, सध्या दुर्लक्षित आहे असे साहित्य अभिजात आहे याची जाण कालांतराने होऊ शकते, याकडेही डॉ. मोरे यांनी लक्ष वेधले.