उस्मानाबाद येथे होत असलेले आगामी अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि आता सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन यामुळे हा २५ लाख रुपयांचा निधी अडकून पडला असल्याची चर्चा आहे. राज्य शासनाचे अनुदान अद्याप नाटय़ परिषदेला मिळालेले नाही हे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी मान्य केले आहे. हा निधी लवकरच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्याचे सांस्कृतिक वैभव असलेले साहित्य संमेलन आणि नाटय़ संमेलनासाठी राज्य शासनातर्फे प्रत्येकी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, ही रक्कम मिळविण्यासाठी साहित्य महामंडळ आणि नाटय़ परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. हे टाळण्याच्या उद्देशातून ‘साहित्य आणि नाटय़ संमेलनासाठी दिले जाणारे २५ लाख रुपयांचे अनुदान हे विजया दशमीला म्हणजेच दसऱ्याला संबंधित संस्थांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल,’ अशी घोषणा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये केली होती. त्यानुसार िपपरी-चिंचवड आणि डोंबिवली येथे झालेल्या साहित्य संमेलनांचे अनुदान विजया दशमीच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या खात्यामध्ये जमा झाले होते. मात्र, गेली दोन वर्षे नाटय़ संमेलनासाठी २५ लाख रुपयांचे अनुदान हे विजया दशमीला नाटय़ परिषदेच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
उस्मानाबाद येथे २१ ते २३ एप्रिल या कालावधीत यंदाचे नाटय़संमेलन होत आहे. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर या नाटय़संमेलनाचे अध्यक्ष आहेत, तर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुजितसिंह ठाकूर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
हे संमेलन अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपले असले तरी अद्याप अनुदानाची रक्कम नाटय़ परिषदेकडे वर्ग झालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ामध्ये अनुदानाचा धनादेश मिळेल, अशी माहिती दीपक करंजीकर यांनी दिली.
अनुदान मिळण्यास वेळ का लागतो?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाटय़संमेलनासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती. साहित्य संमेलनासाठी दिल्या जाणाऱ्या २५ लाख रुपयांच्या अनुदान रकमेची अर्थसंकल्पीय तरतूद केली गेली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनासाठी निधी वेळेत मिळतो. आता तर, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी घोषणा केल्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून विजया दशमीला साहित्य महामंडळाच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जात आहे. मात्र, नाटय़संमेलनाच्या निधीची अशा स्वरूपाची तरतूद अर्थसंकल्पात नसल्यामुळे अनुदानाचा धनादेश मिळण्यास विलंब लागतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.