अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या भोवती 11 हजार आंब्यांची भव्य अशी आकर्षक आरास करण्यात आली होती. तर मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती मंदिरा मध्ये येणार्‍या प्रत्येक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. तर आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी विश्वस्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पहाटे चार वाजता प्रख्यात गायक अजित कडकडे यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. भक्तीगीतांसोबतच गणेशस्तुतीपर गीते देखील यावेळी सादर करण्यात आली.

यावेळी महेश सूर्यवंशी म्हणाले की, दगडूशेठ गणपती मंदिरात वर्ष भर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार अक्षय्यतृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य आज सकाळी दाखविण्यात आला असून दिवसभर भाविकांना आंब्यांची आरास पाहता येणार आहे. तसेच उद्या हा आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि भाविकांना बुधवारी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.