पिंपरी : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी करण्यासाठी तीन सदस्यांचा सहभाग असलेल्या २० समित्यांची स्थापन केली आहे. सहा आणि सात फेब्रुवारी या दोन दिवसात शिक्षण संस्था, वसतिगृहे यांची सखोल तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितींना दिले आहेत.
आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात राज्य महिला आयोगाच्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तीन फेब्रुवारी रोजी आळंदी पोलीस ठाण्यात आढावा बैठक घेतली. परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली होती. नोंदणी नसलेल्या, नियमावलीचे पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तीन सदस्यांचा सहभाग असलेल्या २० समित्या स्थापन केल्या आहेत. सहा आणि सात फेब्रुवारी या दोन दिवसात शिक्षण संस्था, वसतिगृहे यांची सखोल तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितींना दिले आहेत. या २० समिती ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांना आपला अहवाल सादर करणार आहेत. यासाठी यादी तसेच विहित नमुना ही तयार करून देण्यात आला आहे.
अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या आहेत. यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे.
समिती स्थापन झाल्यानंतर चाकणकर म्हणाल्या, ‘वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये सुरू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असून मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय तिथे पोलीस तपास करत आहेत. आता समिती मार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे. सर्व २० समितीचा अहवाल आणि त्यावरील एकत्रित अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल’.
आळंदीत १७५ वारकरी शिक्षण संस्था
आळंदी परिसरात १७५ वारकरी शिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये आळंदीत ११५, तर दिघीत ६० आहेत. या संस्थांमध्ये पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १५८ संस्थांमध्ये मुले आहेत. ‘केवळ मुली असणाऱ्या चार संस्था आहेत. तर, मुले आणि मुली एकत्र असणाऱ्या १३ संस्था आहेत.