आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला आहे. माऊलींच्या पालखीच हे १९३ वं वर्ष आहे. इंद्रायणी काठावर लाखो वैष्णवांचा मेळा भरला होता. अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीत दाखल झाले असून टाळ मृदंगाच्या गजरात ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात वारकरी तल्लीन झाल्याचं बघायला मिळालं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आळंदीत दाखल झाले होते. त्यांनी माऊलींचे दर्शन घेतले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत फुगडी खेळली. यावेळी बारणे यांनी एकनाथ शिंदे यांना वाकून नमस्कार केला. शिंदे यांनीही बारणेंच्या पाठीवर थाप देत आशीर्वाद दिला.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. ग्यानबा तुकारामच्या जयघोषाने अवघी आळंदी दुमदुमून निघाली. पहाटेपासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट केलेली आहे. वैष्णवांचा महामेरू योगी ज्ञानेश्वर असे फुलांनी मोठ्या अक्षरात मंदिराच्या समोरील बाजूस लिहिलं आहे. वारकऱ्यांची इंद्रायणी नदी काठावर मांदियाळी बघायला मिळाली. पवित्र इंद्रायणी नदीत वारकऱ्यांनी स्नान करून माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले आहेत. विधिवत पूजा झाल्यानंतर माऊली, माऊलीच्या गजरात संत श्रेष्ठ माऊलींच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. हा पालखी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी आळंदीत गर्दी केली होती.
मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम हा गांधीवाड्यातील आजोळघरी असेल. पालखी सोहळ्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. साध्या वेशात पोलीस वारीत सहभागी झाले आहेत. स्वतः पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थितीत होते. पोलीस कर्मचारी यांनीही कर्तव्य बजावत पालखी सोहळ्यात सहभागी होऊन फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
हेही वाचा – प्राध्यापकांच्या ‘लाभा’चा मार्ग मोकळा; पण सरकारी तिजोरीवर ३० कोटींपेक्षा अधिक ताण
राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. त्याला सुखी समाधानाचे दिवस येऊ दे. असे साकडं माऊली चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातलं. मी माझं भाग्य समजतो माऊली, पांढुरंग, विठ्ठल यांनी मला इथे येण्याची संधी दिली. यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो असे शिंदे म्हणाले. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार, स्वच्छतेसाठी मी कटिबद्ध असून तसे वचन दिले असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.