पुणे : एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणाला तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना अलंकार पोलिसांनी गजाआड केले.सुमीत उर्फ अभिषेक उर्फ डायमंड राजू आसावरे (वय १९), अभिषेक उर्फ कानोळ्या भारत खंदारे (वय २२, दोघे रा. किष्किंदानगर, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडून तलवार, दुचाकी, दोन साेनसाखळ्या, पेडेंट असा दोन लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आठवड्यापूर्वी शनिवार पेठेत राहणारा एक तरुण सकाळी डीपी रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी गेला होता. त्या वेळी तरुणाला तलवारीचा धाक दाखवून चोरटे आसावरे आणि खंदारे यांनी तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली होती. त्यांच्याबरोबर आणखी एक साथीदार होता. आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. डीपी रस्त्यावर लूटंमारीची घटना घडल्यानंतर या भागात सकाळी आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट उडाली होती.
या घटनेची माहिती मिळताच अलंकार पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. डीपी रस्ता, कर्वेनगर, कोथरूड भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनंतर आराेपी आसावरे, खंदारे यांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्य मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता राेकडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, धीरज पवार, सोमेश्वर यादव, शशिकांत सपकाळ, शिवाजी शिंदे, अंकुश लोंढे, नवनाथ आटोळे, नितीन राऊत, माधुरी कुंभार, शांभवी माने यांनी ही कारवाई केली.