पुणे : लोकसभा निवडणूक निकालात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य घटल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे. या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे आमदार असतानाही काँग्रेसला फायदा झाल्याने मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे, तर लोकसभा निवडणुकीत पक्षाची वाढलेली दीड लाख मतेही काँग्रेसला बळ देणारी ठरणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपने पुणे मतदारसंघ राखला. पुण्यातून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार गिरीश बापट हे साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. या वेळी मात्र मताधिक्य दीड ते पावणेदोन लाखांनी घटले आहे. कसबा, पर्वती आणि कोथरूड या मतदारसंघांनी भाजपला तारले. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकत दिसून आली. तसेच शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मात्र मोहोळ यांना जेमतेम आघाडी मिळाल्याचे पुढे आले आहे.

हेही वाचा…लसीकरणानंतर लहान मुलांना पॅरासिटामॉल द्या! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून योग्य मात्रा जाहीर; पुरेसा साठा ठेवण्याचेही निर्देश

शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील आमदार भाजपचे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगरमधून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी निसटता विजय प्राप्त केला होता. काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी शिरोळेंना कडवी लढत दिली होती. त्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत या मतदारसंघातील भाजपची ताकत वाढली नसल्याचे लोकसभा निकालातून पुढे आले आहे. त्यामुळे शिवाजीनगरमधून केवळ तीन हजारांची आघाडी मोहोळ यांना मिळाली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपचे बारा नगरसेवक निवडून आले होते.

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे भाजपचे आमदार आहेत. या मतदारसंघातूनही धंगेकर यांना १६ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. पूर्वी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजपची ताकत वाढल्याचे गेल्या दोन विधानसभा निवडणुकींतून दिसून आले होते. त्यामुळे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे आमदार या मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे झुकल्याचे धंगेकर यांना मिळालेल्या मताधिक्याने पुढे आले आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वासाठी शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ चिंता वाढविणारे ठरले आहेत. शिवाजीनगरमधील भाजपची कमी झालेली आघाडी आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये काँग्रेसच्या वाढलेल्या मतदानामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांतून काँग्रेस भाजपपुढे आव्हान निर्माण करेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा…पिंपरी : पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड शहर तुंबणार?

‘कसब्या’तील मताधिक्य चर्चेत

वर्षभरापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत कसब्यातून धंगेकर यांनी विजय मिळविला होता. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातच धंगेकर यांनी भाजप उमेदवाराला पराभूत करत विजयश्री खेचून आणली होती. धंगेकर यांनी अकरा हजारांनी विजय मिळविला होता. बालेकिल्ल्यातील या पराभवाची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत होऊ नये, याची दक्षता पोटनिवडणुकीनंतर घेण्यात आली. त्यामुळे ‘कसब्या’तून धंगेकर यांनी तुल्यबळ लढत दिली असली, तरी मोहोळ यांची आघाडी वाढली.

काँग्रेसच्या मतांमध्ये दीड ते पावणेदोन लाखांची वाढ

लोकसभा निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसच्या एकूण मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ३ लाख ८ हजार २०७ मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला ४ लाख ६१ हजार ६९० मते मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये दीड लाखाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा…पिंपरी : पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच इंद्रायणी नदीच्या पाण्यावर फेस

मोहोळ यांना मिळालेले विधानसभानिहाय मताधिक्य

कोथरूड- ७४ हजार ४००

पर्वती- २९ हजार

शिवाजीनगर- ३ हजार २५६
कसबा- १५ हजार
वडगाव शेरी- १४ हजार २००

पुणे कॅन्टोन्मेंट- १६ हजारांची पिछाडी