जिल्ह्य़ातून जाणाऱ्या महामार्गावरील बंदी कायम

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री आस्थापना बंदीचा निर्णय पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीपुरता शिथिल करण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार या महापालिकांच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गालगतची मद्यविक्री करणारी दुकाने, हॉटेल्स आणि बार सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील ३८० मद्यविक्री करणारी दुकाने बुधवारपासून (६ सप्टेंबर) सुरु झाली. मात्र, जिल्ह्य़ातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्यविक्री बंदी कायम राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. १ एप्रिलपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी शहर आणि जिल्ह्य़ात सुरु होती.

चंदीगढ येथील राज्यसरकारकडून महापालिका हद्दीतील रस्त्यांचा दर्जा बदलून (डीनोटिफिकेशन) मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात आली. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमध्ये जुन्या आदेशात सुधारणा करण्यात आली. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर दुतर्फा पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री बंदीचा आदेश महापालिका, नगरपालिका क्षेत्रांना लागू नसेल, असे नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्या आदेशावर राज्य सरकारने विधी विभागाकडून अभिप्राय मागितला होता. त्यानुसार बुधवारपासून (६ सप्टेंबर) महापालिका हद्दीतील मद्यविक्री आस्थापना सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कालपासून सुरु करण्यात आली.

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे पुणे व पिंपरी चिंचवडमधील ३८० हॉटेल, बार आणि दुकाने सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, गेल्या पाच महिन्यांमध्ये शहरातील मद्यविक्रेत्यांचे साडेतीनशे कोटींचे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, काही जणांनी आस्थापना स्थलांतरणासाठी अर्ज केले, तर काहींनी दुकाने विकली आहेत. त्यातील स्थलांतरणाचे प्राप्त झालेले अर्ज रद्द करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला विनंती केली जाईल’, अशी माहिती पुणे हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी बुधवारी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर विधी विभागाच्या अभिप्रायानंतर महापालिका हद्दीतील मद्यविक्री आस्थापना सुरु करण्याचे आदेश बुधवारी उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार ६ सप्टेंबरपासून महापालिका हद्दीतील बंद केलेली मद्यविक्री दुकाने, हॉटेल, बार आणि पब सुरु झाले आहेत. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्य़ातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावरील आस्थापनांमध्ये मद्यविक्री बंदी कायम राहणार आहे.

मोहन वर्दे, जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

Story img Loader