पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने आई आणि भावावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना सेनापती बापट रस्ता परिसरातील रामोशीवाडीत घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एकाला अटक केली. याप्रकरणी गणेश अरुण जाधव (वय २८, रा. रामोशीवाडी, रत्ना हाॅस्पिटलमागे, गोखलेनगर, सेनापती बापट रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत गणेश याचा मोठा भाऊ दिगंबर (वय ३५) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश याने केलेल्या हल्ल्यात दिगंबर आणि त्यांची आई जखमी झाले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश याला दारू पिण्याचे व्यसन आहे. शनिवारी (२५ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास गणेश घरी आला. त्याने आईकडे दारू पिण्यासाठी २०० रुपये मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने तो चिडला. त्याने आईला शिवीगाळ केली, तसेच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी मोठा भाऊ दिगंबर यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गणेशने घरात लाकडे फोडण्यासाठी ठेवलेला कोयता उचलला आणि भाऊ दिगंबर यांच्यावर हल्ला केला. दिगंबर यांच्या डोक्यात कोयता मारला. त्या वेळी आईने मध्यस्थी केली. गणेशने आईच्या डोक्यात काेयत्याने वार केला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात दिगंबर आणि त्यांची आई जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिमत जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई आणि भावाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी गणेश याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश धामणे तपास करत आहेत.