राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील तीनही आमदार पिंपरी-चिंचवडच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत उदासीन व अकार्यक्षम ठरले असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी केली आहे.
विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे आमदार शासन दरबारी शहरातील प्रश्न मांडू शकले नाहीत व शासनाकडे योग्यप्रकारे पाठपुरावाही केला नाही. प्राधिकरण हद्दीतील १५ हजार अनधिकृत घरांच्या नियमितीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने फेटाळला, हे त्याचे धडधडीत उदाहरण आहे. निवडणुका आल्या की आश्वासने देणे व मतप्राप्ती झाल्यानंतर त्याकडे ढुंकूनही न पाहणे ही राष्ट्रवादी नेत्यांची जुनी सवय आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. मात्र, जनतेच्या दृष्टीने कोणतेही दिलासादायक निर्णय त्यांनी घेतले नाहीत. आमदार त्रयी म्हणजे शहरवासियांच्या मानगुटीवर बसलेले भूत आहे. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला असता तर हे प्रश्न सुटले असते. मात्र, त्यात ते असमर्थ ठरले आहेत, अशी टीका पवार यांनी केली आहे.