माणूस हा सर्वात विसरभोळा असतो. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात पुणेकरांनी काय हाल सोसले आहेत, याची आठवण पावसाळा सुरू होताच विसरण्याएवढा विसरभोळेपणा तर नेत्यांकडे नक्कीच असतो. याबरोबरच माणसाकडे जो आशावाद असतो, दुर्दम्य विश्वास असतो, त्यानेही अनेकदा घात होण्याची शक्यता असते. पुण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत नेमके असेच घडते आहे. नव्याने सत्तेत आलेले भाजपचे सरकार जुने व्हायची वेळ आली, तरीही सत्तेचे शहाणपण काही सुचत नाही, असे आता दिसू लागले आहे. याचे कारण येत्या १५ जुलैनंतर पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत एक टक्काही पाणी असणार नाही. जून आणि जुलैमध्ये भरपूर पाऊस पडेल आणि गेल्या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षीही पुणेकरांना भरपूर पाणी मिळेल, असा हा आशावाद आहे आणि तो नियोजनाचे धिंडवडे काढणारा आहे.
[jwplayer bUzK03SZ]
जगातील कोणत्याही प्रगत देशांत पाण्याचे नियोजन अठरा महिन्यांसाठी करण्याची पद्धत आहे. हा विषय गतवर्षी ओरडून सांगितला, तरीही तो नेत्यांच्या डोक्यात शिरत मात्र नाही. गेल्या वर्षी उत्तम पाऊस झाल्यानंतरही किमान अठरा महिने पाणी पुरेल, असे नियोजन करण्याची आवश्यकता याच सदरातून व्यक्त करण्यात आली होती. पण ताटात पडले, पवित्र झाले, असा पवित्रा नेत्यांनी घेतला आणि पाण्याबाबत अतिशय चुकीचे आणि मेंदू बाजूला ठेवून नियोजन करण्याचे ठरवले. या वर्षी महानगरपालिकांच्या निवडणुका असल्याने पाणीकपात कोणत्याही सत्ताधाऱ्यांना परवडणारी नव्हती. पाऊस पाडण्याची आणि मतदारांना भरपूर पाणी देण्याची जबाबदारीही राजकीय पक्षांचीच असते, असा मूर्ख गैरसमज करून घेतल्याने असे घडते. मागील वर्षी दिवसाआड पाणी देण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण धरणांमध्ये पुरेसे पाणीच नव्हते. ते नव्हते, याचे कारण त्याच्या आधीच्या वर्षी पाणी जून महिन्यापर्यंत पुरेल, असेच नियोजन करण्यात आले होते. हीच चूक पुन्हा याही वर्षी करण्याचे काहीच कारण नव्हते. पुढच्यास ठेच मागचा शहाणा होतो, या म्हणीवरील विश्वास उडून जावा, असे हे वर्तन होते.
यंदाच्या वर्षी टेमघर धरणाचे दुरुस्तीचे काम निघाल्याने ते धरण पूर्णपणे मोकळे करण्यात आले. त्यामुळे तेथे साठवणूक झालेले पाणी आता उपयोगात येऊ शकणार नाही. असे काही घडू शकते आणि त्यामुळे नियोजन कोलमडू शकते, याचे भान सत्ताधाऱ्यांना आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना असायला हवे. पण या सगळ्यांनी मिळून भरलेल्या धरणातील पाण्याचा सुखेनैव उपयोग करू देण्यास संमती दिली. ही चूक भविष्यात महागात पडू शकते. वास्तविक मुठा खोऱ्यातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि पानशेत या चार धरणांत साठलेले पाणी किमान अठरा महिने पुरले, असे नियोजन केले असते, तर कदाचित यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले, तरीही फारसे बिघडले नसते. महाराष्ट्रातील अनेक शहरात आत्ताच अनेक दिवसांनी पाणीपुरवठा करावा लागतो आहे. हे लक्षात घेतले, तर पुण्याने पाण्याचा अतिरिक्त वापर करण्याचे काहीच कारण नाही. गेल्या वर्षी सांगलीहून लातूरला रेल्वेने पाणी पुरवण्याची वेळ आली होती, हे एव्हाना सगळेच जण विसरले आहेत.
धरणांमध्ये अधिक पाणी ठेवले आणि भरपूर पाऊस झाला, तर धोका निर्माण होऊ शकतो, हे पाटबंधारे खात्याचे आवडते भाकीत असते. मात्र ते किती चुकीचे आणि अदूरदर्शीपणाचे आहे, हे लक्षात घेण्यात तेथील सरकारी बाबू तयार नसतात. दौंड, इंदापूर, बारामती या भागात होणारा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याच चार धरणांतून होतो. त्यामुळे पुणे ते दौंड या पट्टय़ात पाण्याची साठवणूक करणारे मोठे तलाव निर्माण केले, तर धरणातील अतिरिक्त पाणी साठवण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. पण याकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले आहे. यंदा पाऊस चांगला पडो, अशी प्रार्थना करत असतानाच, संकट येईल, असे गृहीत धरून नियोजन करणे हे सरकारचे कर्तव्य असायला हवे. मात्र या सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. पुणेकरांनी ज्या विश्वासाने त्यांना निवडून दिले, तो विश्वास अशा अदूरदर्शीपणाने उडून जाण्याचीच शक्यता अधिक आहे.
मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com
[jwplayer phsE6MQj]