पुण्याला पाणी पुरवणारी धरणे तुडुंब भरली असून, त्यांच्यातून या पावसाळ्यातील सर्वाधिक वेगाने (सुमारे २७ हजार क्युसेक) पाणी सोडण्यात येत होते. यापुढे धरणांची पाणी सामावून घेण्याची क्षमता उरलेली नाही, त्यामुळे धरणांच्या क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास मुठा पात्रालगत पुराचा धोका संभवतो, असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.
पुण्यात पावसाने शुक्रवारी सलग २३ व्या दिवशी हजेरी लावली. त्याचा जोर धरणांच्या क्षेत्रात जास्त होता. त्यामुळे धरणांमध्ये पाणी येण्याचे प्रमाण जास्त होते. धरणे प्रत्यक्षात भरल्याने आता पाणी सोडावे लागत आहे. शुक्रवारी सायंकाळी त्याचा वेग सर्वाधिक होता. वरच्या पानशेत, वरसगाव धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. ते खडकवासला धरणात आले. त्यामुळे या धरणातून सायंकाळी सुमारे २७ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. आता धरणे भरलेली असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी जास्त वेगाने पाणी सोडावे लागेल. याबाबत संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ईश्वर चौधरी यांनी सांगितले.
मुठा नदीप्रमाणेच पिंपरी-चिंचवड भागातून वाहत येणारी मुळा नदीतसुद्धा मोठय़ा प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे बंडगार्डन पुलाजवळ मुळा-मुठा नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा वेग या हंगामात सर्वाधिक होता. बंडगार्डन पुलावरून तब्बल ५२ हजार ६३८ क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात येत्या दोन दिवसांतही पावसाची शक्यता आहे.