मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पिस्तूल बाळगून बेशिस्त वर्तन केल्याबद्दल महापालिकेचे सुरक्षा अधिकारी संतोष पवार यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी काँग्रेसतर्फे आयुक्त कार्यालयाच्या दारात उपोषण करण्यात आले. दरम्यान, बेशिस्त वर्तनाबाबत पवार यांच्यावर आजपर्यंत वेळोवेळी ज्या कारवाया झाल्या, त्या संबंधीची सर्व कागदपत्रे महापालिकेतून गायब झाल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुणे दौऱ्यात पवार यांनी केलेल्या वर्तनाला सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी जोरदार आक्षेप घेत पवार यांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे नियम तोडल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे पत्र महापालिका आयुक्तांना गेल्या महिन्यात दिले होते. महापालिकेने मात्र पोलीस आयुक्तांच्या पत्राची दखल न घेता पवार यांना समज देऊन हे प्रकरण मिटवले आहे.
काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी लाक्षणिक उपोषण केले. पवार यांना यापूर्वी एकदा निलंबित करण्यात आले होते. इतर काही प्रकरणांमध्ये त्यांच्याकडून वेळोवेळी खुलासे मागवण्यात आले होते. तसेच अन्य काही प्रकरणांतही त्यांच्या विरोधात तक्रारी असून त्याबाबतही कारवाई केली जाणार होती. डेक्कन जिमखाना पोलिसांनीही त्यांच्यासंबंधीची लेखी तक्रार आयुक्तांकडे केली होती. मात्र, पवार यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे, नोटिसा, चौकशी अहवाल महापालिकेतून गायब झाल्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे, असे उपोषण सुरू असताना प्रशासनातर्फे मला सांगण्यात आले, अशी माहिती बालगुडे यांनी दिली.
ही सर्व माहिती प्रशासनाने तातडीने द्यावी, अन्यथा पुढील कारवाई करावी लागेल, असा इशारा काँग्रेसने दिला असून शहराध्यक्ष अभय छाजेड, बालगुडे आणि आयुक्त महेश पाठक यांची यासंबंधी चर्चा झाल्यानंतर लाक्षणिक उपोषणाची सांगता करण्यात आली.

Story img Loader