शहरात साठलेला सर्व कचरा रविवार (२९ मार्च) पर्यंत उचलावा तसेच या कामाच्या आधीची व नंतरची छायाचित्रे यांचा रोजचा अहवाल सादर करावा आणि रविवापर्यंत संपूर्ण शहर कचरामुक्त करावे, असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शहरात अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साठले असून कचरा जाळण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने महापौरांनी  मंगळवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राजेंद्र जगताप, सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, घनकचरा विभागाचे अधिकारी, प्रमुख आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक यांची या बैठकीत उपस्थिती होती.
बैठकीत शहरातील कचरा साठण्याच्या प्रकारावर चर्चा झाली. त्यानंतर पंधरा क्षेत्रीय कार्यालयांपैकी आठ क्षेत्रीय कार्यालये एका अतिरिक्त आयुक्तांकडे आणि उर्वरित सात कार्यालये एका अतिरिक्त आयुक्तांकडे विभागून देण्यात आली. उपायुक्त तसेच खातेप्रमुख आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये रोज सकाळी सात ते अकरा या वेळेत फिरून स्वच्छतेचे काम व कचरा उचलणे या कामांची देखरेख करावी, असे आदेश यावेळी देण्यात आले. या कामात जे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत तसेच अनुपस्थित राहात आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वच्छतेसंबंधीचे जे काम रोज होणार आहे त्याचा अहवाल सहायक आयुक्तांनी द्यावा, असेही सांगण्यात आले असून हे अहवाल सादर करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
शहरात ज्या ज्या भागात तसेच रस्त्यांवर कचरा साठला आहे तो संपूर्ण कचरा रविवापर्यंत उचलण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. तसेच हे काम करताना आधीचे व नंतरचे अशा पद्धतीने छायाचित्रे घ्यावीत व त्याचा रोजच्या रोज अहवाल सादर करावा. शहरातील कचरा उचलण्याचे काम रविवापर्यंत पूर्ण करून सोमवारी (३० मार्च) केलेल्या कामाचे सादरीकरण करावे, असेही महापौरांनी सांगितले.

Story img Loader