साहित्यविषयक विचारांचे आदानप्रदान आणि मंथन करण्याचे प्रभावी माध्यम अशी प्रतिष्ठा असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही आपली आगळीवेगळी ओळख पुसट करत आहे, हे दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ९८ व्या साहित्य संमेलनाने अधोरेखित केले. भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन पार पडले असले, तरी त्यातून साहित्यविषयक विचारमंथन झाले का, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. तब्बल सात दशकांनी देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन अभिजात होईल, ही साहित्यरसिकांची अपेक्षाही फोल ठरली. पुण्यातील एक संस्था दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वीपणे आयोजन करू शकते, हा आत्मविश्वास जरूर मिळाला. यापूर्वी झालेल्या संमेलनानंतर दिल्लीमध्ये साहित्य संमेलन आयोजिण्याची प्रक्रिया ७० वर्षांनी पार पडली. आता राजधानीमध्ये तिसरे संमेलन होण्यासाठी पुन्हा इतकी वर्षे प्रतीक्षा करावी लागायला नको, एवढी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीचे संमेलन हे एका अर्थाने स्मरणरंजनाच्या छायेत होते. ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये शास्त्रीबुवांच्या मार्गदर्शनाचा लाभ झालेल्या लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. तोच कित्ता गिरवित पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या संमेलनाचे उद्घाटक होते. काकासाहेब गाडगीळ यांच्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे उद्घाटन स्थळ बदलून विज्ञान भवन येथे संमेलनाचे उद्घाटन झाले. पवार, मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांमध्ये इतका वेळ गेला, की उत्सवमूर्ती असलेल्या संमेलनाध्यक्षांच्या हाती जेमतेम दहा-बारा मिनिटे उरली. अर्थात, त्यातही वैचारिक अधिष्ठान असलेला हा ‘तारा’ केवळ चमकलाच नाही, तर प्रसंगी ठणकावून विचार मांडताना कडाडलादेखील. तेथून दुसऱ्या उद्घाटन सोहळ्यातील अध्यक्षीय भाषणाचा आनंद लुटण्यासाठी साहित्यप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीमध्ये येण्याची त्रेधातिरपिट करावी लागली.

भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी अफाट कष्ट करून पुराव्यांच्या आधारे प्रस्ताव सादर केला, अशा साहित्यिक-विचारवंतांपैकी एकालाही संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही. संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेत साहित्यिक कमी आणि दिल्लीतील लोकांसाठी वैचारिक कार्यक्रम देण्यापेक्षाही प्रशासन आणि अन्य क्षेत्रांतील व्यक्तींना स्थान देण्यातच धन्यता मानण्यात आली. त्यामुळे उद्घाटन सोहळा वगळता परिसंवाद भरकटल्याचे संमेलननगरीमध्ये दिसले. समारोप सोहळ्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणे लांबल्यामुळे आणि अनेकांना गावाकडे परतण्यासाठी विमान, रेल्वे गाठण्याची कसरत करावी लागणार असल्याने जवळपास ७५ टक्के खुर्च्या रिकाम्या झाल्या. त्याची दखल घेऊन, ‘कोणावर सूड उगवायचा असेल, तर लांबलेल्या कार्यक्रमाच्या शेवटी बोलायला द्यावे,’ अशी टिप्पणी डॉ. तारा भवाळकर यांना करावी लागली.

संतमहिपती ग्रंथदालनामध्ये कापडी मांडव असल्याने प्रकाशक व ग्रंथविक्रेत्यांनी नाराजीचा सूर आळविला. झाले! पहिल्याच दिवशी आभाळ दाटून आल्याने प्रकाशकांची घालमेल सुरू झाली. त्यात सायंकाळनंतर मोठ्या प्रमाणात थंडी पडल्याने पुस्तके दवाने खराब होतील, अशी तक्रारही प्रकाशकांनी आयोजकांकडे केली. मात्र, उद्घाटन सोहळा दुसरीकडे असल्याने त्या दिवशी वाचक दालनाकडे फारसे फिरकलेच नाहीत. पुस्तकांच्या खरेदीला प्रतिसाद नसल्याने दुसऱ्या दिवशी काही ग्रंथविक्रेत्यांनी पुस्तकांच्या बॅगा भरून गाळे रिकामे केले. तिसऱ्या दिवशी तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना असल्याने दिल्लीतील मराठी जनांची उपस्थिती तुरळकच होती. कवी कट्टा येथे सुमार कवींच्या बेसुमार कवितांनी रसिकच नव्हे, तर अध्यक्षस्थान भूषविणारे ज्येष्ठ कवीदेखील हैराण झाले. अध्यक्षांना अनेकांची कानउघाडणी करावी लागली.

अर्थात, संमेलनाच्या आयोजनामध्ये काही त्रुटी असतीलही. पण, सात दशकांनी दिल्लीमध्ये इतक्या सारस्वतांची पावले एका वेळी लागली, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे संमेलन झाले एवढ्यावरच समाधान मानायचे, की पुण्यातील संस्थेने महाराष्ट्राची ‘सरहद’ पार करून देशाच्या राजधानीमध्ये साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले, याचा आनंद मानायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न.

vidyadhar.kulkarni@expressindia.com