पुणे : अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने पॉप्युलर प्रकाशनाचे संचालक रामदास भटकळ यांना जीवनगौरव पुरस्कार तर, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांना साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारक येथे ६ आणि ७ मे रोजी होणाऱ्या चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष अशोक कोठावळे आणि ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी दिली.
हेही वाचा… कोंढव्यात ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात फरशी घालून खून
साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रात सहा दशके दिलेल्या योगदानाबद्दल तसेच वाचन संस्कृती प्रसारासाठी करीत असलेल्या अविश्रांत प्रयत्नांबद्दल रामदास भटकळ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर प्रवीण दवणे यांनी गीत, पटकथा आणि ललित लेखन अशा विविध माध्यमातून केलेल्या साहित्य निर्मितीबद्दल त्यांना साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.