पिंपरीतील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या पुढाकाराने मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय ‘पायी मोर्चा’ला सोमवारी निगडीतून सुरुवात झाली. अनधिकृत बांधकामे नियमित करू, असे सांगून सत्ताधारी जनतेची फसवणूक करत असून यासंदर्भात अध्यादेश काढण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूहाजवळ सकाळी आठपासून नागरिक जमले होते. छत्रपती शिवाजीमहाराज व संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांना पुष्पहार अर्पण करून दहाच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. शिवसेनेचे खासदार गजानन बाबर, सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे, शहराध्यक्ष भगवान वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार, सरचिटणीस नामदेव ढाके, नगरसेवक संपत पवार, सुलभा उबाळे, अश्विनी चिंचवडे आदींसह दोन हजाराहून अधिक नागरिक या पायी मोर्चात सहभागी झाले होते.
दलालांचा अड्डा बनलेले प्राधिकरण बरखास्त करा, जाचक शास्तीकर रद्द करा, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबली पाहिजे असे अनेक फलक नागरिकांच्या हातात होते. सकाळी साडेदहाला आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले. देहूरोडमध्ये ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. याच ठिकाणी जेवण घेऊन आंदोलक तळेगावच्या दिशेने निघाले. सायंकाळी तळेगाव येथेच आंदोलकांनी मुक्काम केला.

Story img Loader